Headlines

पुणे रेल्वे स्थानकाची क्षमता दुप्पट होणार:मुख्यमंत्री, रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते पुणे-शिर्डी एक्सप्रेसचा शुभारंभ, विकासकामांचे भूमिपूजन




पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले की, पुणे रेल्वे स्थानकाची क्षमता दुप्पट होणार असून, येथे ६ नवीन प्लॅटफॉर्म तयार केले जातील आणि सध्याच्या ६ प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात येईल. पुण्याची मोठी लोकसंख्या लक्षात घेता येथे मेगा टर्मिनस उभारणीच्या कामालाही सुरुवात होत आहे. यावेळी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकात यार्डच्या रिमॉडेलिंगची पायाभरणीही करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार दूरदृष्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पुणे स्थानकावर केंद्रीय नागरी विमानवाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार विवेक कोल्हे, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव आणि पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. केवळ पुणे जंक्शनच नव्हे, तर खडकी, हडपसर, शिवाजीनगर, घोरपडी, फुरसुंगी आणि आळंदी या पुणे परिसरातील सर्व क्षेत्रांना केंद्रस्थानी ठेवून रेल्वेचा विकास करण्यात येत असल्याचे वैष्णव यांनी सांगितले. पुण्याची लोकसंख्या ७० लाखांहून अधिक असल्याने येथे एका मेगा कोचिंग टर्मिनलची आवश्यकता आहे. त्यामुळे रेल्वेच्या आळंदी येथील जागेवर मेगा टर्मिनलचे काम हाती घेण्यात आले असून, येथे ९ नवीन प्लॅटफॉर्म, ७ फ्रेट लाईन्स आणि १७ स्टॅबलिंग लाईन्स तयार केल्या जातील. फुरसुंगी येथेही ५ नवीन स्टॅबलिंग लाईन्स बनवण्यात येत आहेत. पुण्यात ६०० कोटी रुपयांच्या विकास कामांतर्गत ६ नवीन प्लॅटफॉर्म तयार केले जाणार असून, सध्याच्या ६ प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात येणार आहे. यामुळे एकूण १२ प्लॅटफॉर्म उपलब्ध होतील. पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वेचे कार्यान्वयन (ऑपरेशन कंट्रोल) जुन्या प्रणालीऐवजी पूर्णतः डिजिटल प्रणालीवर आधारित असेल. पुणे रेल्वे स्थानकात सध्या दोन प्रवेशद्वार असून, तिसरे प्रवेशद्वारही तयार करण्यात येणार आहे. यामुळे गर्दीचे योग्य प्रकारे नियमन करणे शक्य होईल. आळंदी येथे मेगा कोचिंग टर्मिनल तयार झाल्यामुळे गाड्यांची स्वच्छता आणि देखभाल दुरुस्तीचे काम पुण्यातून तेथे स्थलांतरित होईल. यामुळे पुणे रेल्वे स्थानकाची रेल्वे हाताळणीची क्षमता दुप्पट होणार असून, येथून अतिरिक्त २० गाड्या चालविल्या जाऊ शकतील. ही सर्व कामे येत्या तीन वर्षांत पूर्ण केली जातील, अशी माहितीही वैष्णव यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *