Headlines

पुणे वाहतूक कोंडी, प्रदूषणावर उपाय; तीन उन्नत मार्ग:केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारणीची घोषणा




केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी तीन उन्नत मार्गांची घोषणा केली आहे. पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत हे तीन प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भूसंपादनाच्या अडचणींमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे मार्ग उभारले जात आहेत. या प्रकल्पांसाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण सहकार्य केल्याबद्दल गडकरींनी समाधान व्यक्त केले. प्रकल्पांमध्ये वापरण्यात येणाऱ्या पोलाद आणि सिमेंटवरील राज्य शासनाचा वस्तू व सेवा कर (GST) माफ करण्यात आला आहे. तसेच, वाळू, खडी आणि अन्य बांधकाम साहित्यावरील स्वामित्व धन (royalty) माफ करण्यासोबतच भूसंपादन प्रक्रियेतही शासनाने मोठे सहकार्य केले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळेच प्रकल्पांना गती मिळाल्याचे गडकरींनी नमूद केले. रस्ते आणि पुलांच्या बांधकामात जागतिक दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. मलेशियामध्ये विकसित ‘अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्समेंट काँक्रिट’ या तंत्रज्ञानामुळे पुलांतील दोन खांबांमधील अंतर ३० मीटरवरून १२० मीटरपर्यंत वाढवता येते. यामुळे खर्चात बचत होते आणि एकाच खांबावर रस्ता, पूल व मेट्रो अशी रचना उभारणे शक्य होते. पुलांची सुरक्षितता आणि गुणवत्ता कायम राखण्यासाठी रबरी बेअरिंग्ज व एक्स्पान्शन जॉइंट्सच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करू नये, अशा स्पष्ट सूचना गडकरींनी अधिकारी आणि कंत्राटदारांना दिल्या. पुणे आणि मुंबईतील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी कमी करण्यासाठी उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारी वाहतूक शहराबाहेरून वळवण्याचे नियोजन आहे. सुरत-नाशिक-अहिल्यानगर-सोलापूर या नव्या महामार्गामुळे उत्तरेकडील सुमारे ४० ते ४५ टक्के वाहतूक पुणे आणि मुंबईत प्रवेश करणार नाही. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम ऐतिहासिक स्वरूपाचे झाले असून, या मार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच ज्ञानेश्वरीत उल्लेख असलेल्या वृक्षांची लागवड करण्याच्या सूचनाही गडकरींनी दिल्या. राज्यातील इतर महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांनाही गती दिली जात आहे. नाशिक फाटा ते खेड या ३० किलोमीटर लांबीच्या सुमारे ८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. भूसंपादन पूर्ण होताच या कामाला सुरुवात केली जाईल. खंबाटकी घाटातील नवीन बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात असून, त्याचे उद्घाटन लवकरच होणार आहे. तसेच, जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ठाणे ते पुणे आणि पुढे शिरूरमार्गे छत्रपती संभाजीनगरपर्यंत जोडणाऱ्या सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या नव्या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *