![]()
एका बाजूला दुष्काळसदृश परिस्थिती, तर दुसऱ्या बाजूला शेती, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी स्थानिक नागरिकांची धडपड. अशा संकटाच्या काळात पैठण तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपशाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेवराई तालुक्यातील बोरगाव येथे अधिकृत वाळू लिलावाच्या नावाखाली पैठण तालुक्यातील वडवाळी, आपेगाव, हिरडपुरी, नायगाव, मायगाव आणि पाटेगावसह इतर भागांतून दररोज ५०० ब्रासपेक्षा अधिक वाळूचा अवैधरीत्या उपसा सुरू आहे. कोणत्याही प्रकारचा अधिकृत ठेका नसलेल्या ठिकाणीही उपसा सुरू असल्याने नदीपात्राच्या संरक्षणासह वाळूविरोधी पथकाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न निर्माण झाले आहे. गेवराई तालुक्यातील बोरगाव येथील वाळू लिलावाचा कागदोपत्री आधार दाखवून पैठण तालुक्यातील विविध ठिकाणांहून अवैध वाळू काढली जात असल्याच्या तक्रारी आहेत. वाळू लिलावाच्या परवानगीमध्ये निश्चित केलेले क्षेत्र, उत्खननाचे एकूण प्रमाण, कालावधी आणि वाहतुकीचे मार्ग यांना कायदेशीरदृष्ट्या विशेष महत्त्व असते. मात्र, या सर्व अटी व शर्तींचे उल्लंघन करून इतर ठिकाणांहून वाळू काढली जात आहे. त्यामुळे गोदावरीच्या वडवाळी, आपेगाव, पाटेगावसह लगतच्या परिसरातील नदीपात्राची महसूल व खनिकर्म विभागाने संयुक्त पाहणी करावी, अशी मागणी होत आहे. बोरगावच्या लिलावाची अधिकृत कागदपत्रे, परवानगीचे क्षेत्र, वाहतूक पास आणि वाहतुकीचे मार्ग यांची पडताळणी केल्यास या तक्रारींमधील सत्यता तात्काळ स्पष्ट होऊ शकते. वाळू वाहतुकीसाठी होणारी वाहनांची धावपळ, नदीपात्रात तयार होणारे खड्डे आणि नैसर्गिक रचनेत होणारे बदल यामुळे पर्यावरणीय हानीसोबतच मानवी जीवितालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसाचे प्रमाण कमी असताना नदीपात्रातील प्रत्येक जलस्रोताचे महत्त्व वाढते.
Source link
पैठणला गोदावरीच्या पात्रामधून रोज 500 ब्रास वाळूचा अनधिकृत उपसा:वडवाळी, आपेगाव, हिरडपुरी, पाटेगावच्या नदीपात्राचा वापर