![]()
पारंपरिक शेतीला आधुनिक विचारांची जोड दिली, तर शेतीतूनही लाखोंचे उत्पन्न मिळू शकते. हे सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथील शेतकरी श्रीकांत नवल यांनी सिद्ध केले आहे. दुष्काळामुळे पाण्याची कमतरता असतानाही त्यांनी वेलवर्गीय बीन्स भाजीपाला पिकाची लागवड करून उत्पन्नाचा नवा मार्ग शोधला आहे. विशेष म्हणजे या प्रयोगातून त्यांना खर्च वजा जाता एक एकरात सुमारे पावणे तीन लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळत आहे. नवल यांचा हा प्रयोग आता परिसरातील 50 पेक्षा अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. विक्री व्यवस्थेत एकजूट कायम सुरुवातीला काही शेतकऱ्यांनी केलेला हा बीन्स लागवडीचा प्रयोग आता गावकऱ्यांसाठी फायद्याचा ठरत आहे. या शेती प्रयोगाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे गावातील शेतकऱ्यांनी विक्री व्यवस्थेत एकजूट कायम ठेवली आहे. सर्व शेतकऱ्यांचा माल एकत्र करून त्याची थेट शेतातूनच खरेदी होत असल्याने स्वतंत्रपणे माल विक्रीसाठी नेण्याचा व मालवाहतुकीचा खर्च आणि त्रास पूर्णपणे मिटला आहे. जागेवरच विक्रीची सुविधा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खर्च व उत्पन्नाचे तुलनात्मक गणित पारंपरिक मक्याच्या पिकातून एकरी सुमारे 70 हजार रुपयांचे उत्पन्न मिळायचे. मात्र बियाणे, खते, मशागत, मजुरी मिळून 50 हजार रुपये खर्च होऊन हातात निव्वळ 20 हजार रुपयेच उरायचे. याउलट, बीन्सच्या प्रयोगात बियाणे 1 क्विंटल घेतले जाते. एकरी उत्पादन 70 क्विंटल निघते व दर 5 हजार रुपये प्रति क्विंटल मिळतो. लागवड आणि मशागतीचा 70 ते 75 हजार रुपयांचा खर्च वजा जाता, अवघ्या 4 महिन्यांत हातात सुमारे 2 लाख 70 हजार रुपयांचा निव्वळ नफा उरत आहे. कमी पाणी आणि खर्चाचे योग्य नियोजन करून शेतीत कसा बदल घडवता येतो, याचे उत्तम उदाहरण या प्रयोगातून समोर आले आहे. (प्रगतिशील शेतकरी श्रीकांत नवल यांचा मोबाइल नंबर 9422707027)
Source link
प्रगतिशील शेतकरी:कमी पाण्यात बीन्सची लागवड, एकरी पावणे तीन लाख नफा; सिल्लोडच्या शेतकऱ्याचा 4 महिन्यात यशस्वी प्रयोग