Headlines

प्राप्तिकर वसुलीसाठी आता ‘AI’ चा वॉच!:नव्या कायद्यात चॅटबॉट देणार करदात्यांना माहिती; पुण्यात 'प्रारंभ 2026' संपन्न




प्राप्तिकर वसुलीसाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर केला जाणार असून, चॅटबॉटद्वारे करदात्यांना सर्व माहिती उपलब्ध होईल. प्राप्तिकर 2025 हा नवा कायदा अधिक सुस्पष्ट आणि सोप्या भाषेत तयार केल्याचा दावा करण्यात आला आहे. पुण्यात ‘प्रारंभ2026’ या पहिल्या लोकाभिमुख कार्यक्रमात प्रधान आयुक्त विवेक वाडेकर यांनी ही माहिती दिली. पुणे शहरातील गणेशखिंड येथील कॉसमॉस बँकेच्या सभागृहात प्राप्तिकर विभागातर्फे नव्या आयकर कायद्याविषयी माहिती देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, उद्योजक लीला पूनावाला, प्रदीप भार्गव आणि पुणे प्राप्तिकर विभागाचे प्रधान आयुक्त विवेक वाडेकर उपस्थित होते. प्रधान आयुक्त विवेक वाडेकर यांनी सांगितले की, नवा प्राप्तिकर कायदा 2025 हा 1961 च्या कायद्याच्या तुलनेत खूप सोपा आणि सरळ आहे. यात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, चॅटबॉट आता करदात्यांना सर्व माहिती देईल. यापुढे करसंकलन आणि करचुकवेगिरी शोधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. खासदार डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, नवा कायदा अधिक सोपा आणि सुटसुटीत झाल्यामुळे करवसुली वेगाने आणि अधिक प्रमाणात होईल. जुना कायदा खूप क्लिष्ट होता, मात्र मोदी सरकारने 1961 चा कायदा बदलून नवा कायदा सहज सोपा केला आहे. यामुळे सज्जन आणि प्रामाणिक करदात्यांची पिळवणूक किंवा त्रास थांबेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्योजिका लीला पूनावाला यांनी सांगितले की, आयकर म्हटल्यावर पूर्वी लोक घाबरत असत आणि कायद्याच्या क्लिष्टतेमुळे सर्वांना चार्टर्ड अकाउंटंटची (CA) मदत घ्यावी लागत असे. आता कायदा सोपा झाल्याने सीएवरील भार कमी होण्यास मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. प्रदीप भार्गव यांनी नमूद केले की, जुना कायदा वाचला तरी कळत नव्हता, पण आताचा कायदा सोपा आणि केवळ 23 पानांचा आहे. अनेक कलमे कमी केल्याने तो जनसामान्यांना समजण्यास मदत होईल. असे लोकाभिमुख कार्यक्रम घेतल्यास लोकांच्या मनातील कायद्याची भीती कमी होईल, असेही ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *