![]()
पुण्यात एका प्रियकराने तरुणीची १८ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. व्यवसायासाठी कर्ज काढायला लावून प्रियकराने ही फसवणूक केली. तरुणीने पैसे परत मागितल्यावर त्याने तिचे फोटो समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली. या प्रकरणी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंढवा पोलिस ठाण्यात एका तरुणीने याबाबत फिर्याद दिली आहे. रोहित अतुल पाटील (वय ३१, रा. श्रीरामनगर, चोपडा, जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा जळगावचा आहे. फिर्यादी तरुणी आणि आरोपीची दहा वर्षांपूर्वी जळगावमधील एका महाविद्यालयात ओळख झाली होती. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर तरुणी पुण्यात शिक्षणासाठी आली आणि आरोपीही तिच्यासोबत पुण्यात येऊन एकत्र राहू लागला. सुरुवातीला, आरोपीने तरुणीला दुसऱ्या तरुणासोबत मैत्री असल्याच्या संशयावरून मारहाण केली होती. त्यामुळे तरुणीने त्याच्याशी संबंध तोडले आणि आरोपी गावी निघून गेला. २०२३ मध्ये तरुणीने विवाह केला. विवाहानंतरही आरोपीने तिला पैसे मागण्यास सुरुवात केली आणि पैसे न दिल्यास पतीला छायाचित्रे पाठवण्याची धमकी दिली. या त्रासामुळे तरुणीचा पतीशी वाद होऊन तिने घटस्फोट घेतला. फेब्रुवारी २०२५ मध्ये आरोपी पुन्हा पुण्यात आला आणि मुंढव्यातील केशवनगर भागात तो तरुणीसोबत एकत्र राहू लागला. त्याने तरुणीला बिअर शॉपी सुरू करायची असल्याचे सांगून दोन बँकांकडून १८ लाख रुपयांचे कर्ज काढण्यास सांगितले. तरुणीने हे कर्ज काढले. जुलै ते नोव्हेंबर २०२५ पर्यंत आरोपीने बँकेचे हप्ते भरले, परंतु त्यानंतर त्याने हप्ते भरण्यास नकार दिला. तरुणीने त्याच्याकडे पैशांची विचारणा केली असता, तो जळगावला निघून गेला. त्याने तरुणीची सोन्याची अंगठीही गहाण ठेवली होती. तसेच, तिची छायाचित्रे आणि चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली. आरोपीच्या सततच्या त्रासामुळे तरुणीने नुकतीच मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक कवीराज पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Source link
प्रियकराकडून तरुणीची 18 लाखांची फसवणूक:पैसे परत मागितल्यावर समाज माध्यमांवर फोटो व्हायरल करण्याची धमकी; गुन्हा दाखल