![]()
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील चांपा ग्रामपंचायतीने ‘स्टील भांडी बँक’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. यामुळे गावात प्लास्टिकमुक्तीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले असून, थर्माकोल पत्रावळ्या आणि ‘युज अँड थ्रो’ संस्कृतीला मोठा आळा बसला आहे. हा उपक्रम महाराष्ट्रातील इतर ग्रामपंचायतींसाठी आदर्श ठरत आहे. नागपूर-उमरेड महामार्गावर असलेल्या चांपा गावात हॉटेल व्यवसाय, पर्यटकांची वर्दळ आणि सार्वजनिक कार्यक्रमांमुळे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व थर्माकोल कचरा जमा होत होता. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून ग्रामपंचायतीने सरपंच सोनाली अतिश पवार आणि माजी सरपंच अतिश पवार यांच्या संकल्पनेतून आदिवासी महिला बचत गटांच्या सहकार्याने ‘स्टील भांडी बँक’ची संकल्पना प्रत्यक्षात आणली. या उपक्रमांतर्गत, वाढदिवस, लग्नसोहळे, धार्मिक कार्यक्रम किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रमांसाठी ग्रामपंचायतीमार्फत माफक दरात स्टीलची भांडी उपलब्ध करून दिली जातात. यामध्ये 700 स्टील ताटे, 1000 वाट्या, 1000 ग्लास, पाणी वाढण्याचे मग, मोठे चमचे आणि बादल्या यांसारख्या साहित्याचा समावेश आहे. कार्यक्रम संपल्यानंतर ही भांडी स्वच्छ करून परत जमा करावी लागतात. यामुळे गावातील प्लास्टिक ग्लास, थर्माकोल पत्रावळ्या आणि ‘युज अँड थ्रो’ संस्कृतीला प्रभावीपणे आळा बसला आहे. या उपक्रमामुळे केवळ प्लास्टिक कचऱ्यात घट झाली नाही, तर आदिवासी महिला बचत गटांना रोजगाराची संधी मिळाली असून, महिलांचे आर्थिक सक्षमीकरणही झाले आहे. ‘स्टील भांडी बँक’ व्यतिरिक्त, चांपा गावाने गेल्या काही वर्षांत विकासाची अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत. गावातील मोठ्या दगडांवर वाघ, अस्वल, मोर यांसारख्या वन्यप्राण्यांची आकर्षक चित्रे रंगवण्यात आली आहेत, ज्यामुळे गावाला पर्यटनस्थळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. संपूर्ण गाव सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असून, ही यंत्रणा सौर ऊर्जेवर चालणाऱ्या हायमास्टद्वारे कार्यरत आहे. जलसंधारणासाठी वनराई बंधारे, बंदिस्त नाल्या आणि विहिरींची दुरुस्ती यांसारखी कामे करण्यात आली आहेत. यामुळे गावातील भूजल पातळीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. ‘आर. आर. आबा पाटील सुंदर गाव अभियान’ अंतर्गत चांपाने तालुक्यातील पहिली ‘स्मार्ट ग्रामपंचायत’ होण्याचा मानही पटकावला आहे. चांपा ग्रामपंचायतीच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांची राज्य स्तरावरही दखल घेण्यात आली आहे. ‘माझी वसुंधरा 5.0 अभियान’ मध्ये 1000 ते 1500 लोकसंख्या गटात चांपा गावाने नागपूर विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सध्या हे गाव ‘माझी वसुंधरा 6.0’ अभियानाकडे यशस्वी वाटचाल करत आहे.
Source link
प्लास्टिकमुक्तीसाठी चांपा ग्रामपंचायतीचा पॅटर्न:सुरू केली 'स्टील भांडी बँक', नागपूर विभागात मारली बाजी