![]()
शहराला प्लास्टिकमुक्त आणि स्वच्छ बनवण्यासाठी महानगरपालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे. महानगरपालिका उत्तर झोन क्र. १ रामपुरी कॅम्प आणि मध्य झोन क्र. २ राजापेठ अंतर्गत येणाऱ्या मोची गल्ली परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इतवारा परिसरातील २२ आस्थापनांची तपासणी करून त्यांच्याकडून एकूण १२ हजार रुपयांचा त्याचप्रमाणे मोची गल्लीतून ५ हजार रु.दंड वसूल झाला. अशाप्रकारे एकूण १७ हजार रु. दंड वसुलीची कारवाई करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव आणि सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक जप्ती पथकाने बाजारपेठेत कसून तपासणी केली. तपासणीदरम्यान पवन किराणा या दुकानात शासनाने प्रतिबंधित केलेले प्लास्टिक आढळून आल्याने त्यांच्यावर थेट ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवून दुकानात डस्टबिन (कचराकुंडी) न ठेवणाऱ्या ७ व्यापाऱ्यांवर प्रत्येकी १,००० रुपयांप्रमाणे एकूण ७,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. व्यंकटेश तेल भंडार, प्रवीण साहू, जय बजरंग स्वीट मार्ट, राजु नमकीन, शिवाणी स्वीट मार्ट, पटेरिया स्वीट मार्ट, हेमराज साहू इत्यादी दुकानांवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर महापालिका मध्य झोन क्र. २ राजापेठ अंतर्गत येणाऱ्या मोची गल्ली परिसरात मंगळवार १९ मे रोजी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर केल्याप्रकरणी साहिल ट्रेडर्स या आस्थापनाला तब्बल ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.‘स्वच्छ शहर-सुंदर शहर’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी सर्व नागरिक आणि व्यापाऱ्यांनी प्लास्टिकमुक्त परिसर निर्मितीस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेत प्लास्टिक नोडल अधिकारी ए. के. गोहर, ज्येष्ठ स्वास्थ निरीक्षक राजू डीक्याव, प्लास्टिक स्वास्थ निरीक्षक सचिन सैनी यांच्यासह स्वास्थ निरीक्षक मेघराज ढेनवाल, निखिल खंगाळे, एम. सैय्यद, शाहू जवंजाळ, अनिकेत महल्ले आणि आशिष सहारे यांनी सहभाग घेतला. शहरात येणाऱ्या प्लास्टिकला रोखणे गरजेचे या विशेष मोहिमेदरम्यान पथकाने मोची गल्ली परिसरातील एकूण १८ व्यापारी आस्थापनांची अचानक भेट देऊन कसून तपासणी केली. सुदैवाने, तपासणी दरम्यान अनेक व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती दिसून आली. अनेक ठिकाणी कापडी व कागदी पिशव्यांचा, तसेच शासनाने परवानगी दिलेल्या ५१ मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीचा वापर होत आहे. व्यापाऱ्यांनी नियमांचे काटेकोर पालन करावे शहरातील स्वच्छता राखण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्रतिबंधित प्लास्टिक विरोधातील ही मोहीम यापुढेही अशीच सातत्याने सुरू राहणार आहे. सर्व व्यापारी बांधवांनी स्वतःहून पुढाकार घेऊन शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
Source link
प्लास्टिक जप्ती, डस्टबिन तपासणीची विशेष मोहीम:17 हजाराचा दंड वसूल, अमरावतीत पालिकेची इतवारा बाजार परिसरात मोहीम