![]()
फुरसुंगी येथील एका स्टील व्यापाऱ्याच्या गोदामावर झालेल्या गोळीबार (फायरिंग) प्रकरणाच्या तपासात पुणे पोलिसांच्या हाती अत्यंत महत्त्वाची माहिती लागली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी रवी कुमार याने पोलिस चौकशीत धक्कादायक खुलासे केले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून बिश्नोई गँगच्या संपर्कात आल्याचे त्याने मान्य केले आहे. ४ जण ताब्यात, फरार शुभम लोणकरचा शोध सुरू या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या अल्पवयीन मुलाचे खरे वय निश्चित करण्यासाठी वैद्यकीय चाचणी केली जाणार असून, पोलिसांनी न्यायालयाकडे त्याची परवानगी मागितली आहे. दरम्यान, पोलीस रवी कुमार आणि आरजू बिश्नोई यांच्यातील चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्सची फॉरेन्सिक तपासणी करत आहेत. या गुन्ह्यातील फरार आरोपी शुभम लोणकर याच्याविरोधात लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. सोशल मीडिया आणि सिग्नल ॲपचा केला आरोपीने वापर आरोपी रवी कुमारने पोलिसांना सांगितले की, तो सोशल मीडियावर बिश्नोई गँगशी संबंधित बातम्या आणि पोस्ट सतत वाचत असे. या पोस्टमुळे प्रभावित होऊन तो या गँगशी जोडला गेला. पुढे त्याचा संपर्क बिश्नोई गँगचा सक्रिय सदस्य आरजू बिश्नोई याच्याशी ‘सिग्नल ॲप’द्वारे झाला. पुणे येथील व्यापारी वर्गात स्वतःची दहशत आणि दबदबा निर्माण करण्यासाठी हा गोळीबार करण्यात आला होता. छळाचा बदला घेण्यासाठी बिश्नोई गँगची मदत घेण्याचे ठरवले तपासात समोर आले आहे की, रवी कुमार ज्या कंपनीत काम करत होता, तिथे त्याचा छळ होत होता. याच छळाचा बदला घेण्यासाठी त्याने बिश्नोई गँगची मदत घेण्याचे ठरवले. रवीनेच कंपनी आणि तिच्या सर्व संचालकांची (डायरेक्टर्स) गोपनीय माहिती गँगला पुरवली, ज्याच्या आधारे हा गोळीबाराचा कट रचण्यात आला. डॉक्टरांकडे खंडणी मागणारा गुंड जेरबंद पुणे | येरवडा भागात एका डॉक्टरांना धमकावून ५० हजारांची खंडणी मागणाऱ्या गुंडाला पोलिसांनी अटक केली. गुंडाकडून कोयता जप्त करण्यात आला. याप्रकरणी अमोल जीवराज पिल्ले (४६, रा. जयजवाननगर, येरवडा) याला अटक करण्यात आली. पिल्ले याच्याविरुद्ध येरवडा, लक्ष्मीनगर, बंडगार्डन, तसेच कर्नाटकातील यादगीर पोलिस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, लूटमार, शस्त्र बाळगणे असे ५८ गुन्हे दाखल आहेत. ८ जून रोजी सायंकाळी तो डॉक्टरांकडे गेला. कोयता घेऊन तो थेट दवाखान्यात शिरला. डॉक्टरांकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने कोयता उगारून दवाखान्यासमोर दहशत माजविली. ‘पीके’ मार्क असलेल्या पिस्तुलाचे पाकिस्तान कनेक्शन? पोलिसांनी आरोपींकडून तीन पिस्तुले जप्त केली आहेत. या शस्त्रांवर “ पीके” असे लिहिलेले आढळले आहे. ही शस्त्रे पाकिस्तान निर्मित आहेत का? किंवा त्यांचा मूळ स्रोत काय आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून फॉरेन्सिक आणि बॅलेस्टिक तपासणी केली जात आहे. अहवाल आल्यानंतरच याबाबत अधिक स्पष्टता येईल, असे पोलिसांनी सांगितले.
Source link
फुरसुंगी गोळीबार:सोशल मीडियामधून ‘बिश्नोई’ गँगच्या संपर्कात आला आरोपी, सिग्नल ॲपवरून कट रचल्याचे स्पष्ट