.

यंदा कमी झालेले पर्जन्यमान आणि आगामी काळात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मनपा आता पाणीबचतीसाठी कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शहरातील उपलब्ध जलसाठा काटकसरीने वापरला जावा, यासाठी पाण्याचा बिगर आवश्यक कामांसाठी होणारा वापर रोखण्यासाठी लवकरच निर्बंध जाहीर केले जाणार आहेत. बांधकामे, वाहन धुणे, रस्ते धुणे, स्विमिंग पूल तसेच अन्य कामांसाठी पिण्याचे पाणी वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होणार आहे. त्यामुळे टंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी आतापासूनच पाण्याचा वापर नियंत्रित करण्याच्या दिशेने महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. लवकरच निर्बंध लागू करण्याची तयारी प्रशासनाकडून केली जात आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच वेळेत काटेपूर्णा प्रकल्पात ९५.७१ टक्के जलसाठा होता जो की आता केवळ २१.०९ टक्के इतका आहे. सद्यस्थितीतच पाण्याची पातळी धोकादायक स्थितीत असल्याने कठोर पावले उचलण्याशिवाय प्रशासनासमोर पर्याय नसणार आहे.
मलजलशुद्धीकरण केंद्राच्या पाण्याचा पर्यायी वापर निर्बंध घातल्यानंतर इतर कामांसाठी पर्यायी पाणी उपलब्ध असणेही आवश्यक आहे. त्यासाठी शिलोडातील मलजलशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्याचे नियोजन करु शकते. शिलोडा येथे ३० एमएलडी क्षमतेचे मलजलशुद्धीकरण केंद्र आहे. या केंद्रातून प्रक्रिया करून नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी टँकरद्वारे उपलब्ध करून दिले जाण्याची शक्यता आहे. बांधकामे, वाहन धुणे यांसारख्या वापरासाठी हे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
कठोर पावले उचलावी लागणार ^पावसाचे शिल्लक राहिलेले दिवस आणि उपलब्ध जलसाठ्याचा विचार करता पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे बांधकाम, वाहन धुणे यांसारख्या कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळण्यासाठी भविष्यात कठोर निर्बंध लागू केली जातील. पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवावे लागणार आहे. – डॉ. सुनील लहाने, आयुक्त, महानगरपालिका
नियम मोडल्यास होणार दंड निर्बंध लागू झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा अनावश्यक वापर करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. वाहन धुणे, बांधकाम किंवा अन्य कामांसाठी नळाद्वारे मिळणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा किंवा विहिर, बोअरवेल यासारख्या जलस्त्रोतांचा वापर होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.
बाष्पीभवनामुळे साठ्यात घट काटेपूर्णा धरणातील जलसाठा कमी होत असून सध्या केवळ २१.०९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. परिणामी उपलब्ध जलसाठ्यावरही त्याचा परिणाम होत आहे. धरणातील साठा दररोज कमी होत असल्याने आगामी काळात शहरासमोर पाणीटंचाईचे आव्हान निर्माण होणार आहे.