![]()
उन्हाचा कडाका आणि निष्काळजी वाहनचालकांमुळे बिडकीन परिसरात रविवारी अक्षरशः ‘काळा दिवस’ ठरला. दिवसभरात दोन ठिकाणी अपघात घडले. त्यापैकी दोन भीषण अपघातांत दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पहिली दुर्घटना पैठण-बिडकीन मार्गावरील हॉटेल पार्वतीसमोर सायंकाळी सुमारे ५ ते ५.३० वाजेच्या दरम्यान घडली. एका भरधाव रिक्षाने समोरून येणाऱ्या वाहनाला चुकवण्याच्या प्रयत्नात अचानक वळण घेतल्याने चालकाचा ताबा सुटला आणि रिक्षा उलटली. या भीषण अपघातात रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी झाले. यामध्ये छाया जनार्दन कोथिंबिरे यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. तर, मंगल विलास कोथिंबिरे ही महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरी घटना रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सोमपुरी ते बिडकीन मार्गावरील मोतीनगर येथे घडली. दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात सिद्धू ऊर्फ शंतनू आहुजा काळे (१७, रा. नांदलगाव, ता. पैठण) याला गंभीर अवस्थेत ग्रामीण रुग्णालय बिडकीन येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. तर, सुरेश शिंदे आणि स्वाती शिंदे (दोघेही रा. कल्याणनगर, बिडकीन) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Source link
बिडकीनमध्ये दोन भीषण अपघातांत दोघांचा मृत्यू, चार जण गंभीर जखमी:छत्रपती संभाजीनगर-पैठण महामार्गावर बिडकीन परिसरात घडले अपघात