Headlines

भंडाऱ्यात आनंदाच्या क्षणांवर काळाचा घाला:लग्नावरून परतताना वऱ्हाड्यांच्या गाडीचा भीषण अपघात; 4 महिलांसह 5 जणांचा जागीच मृत्यू




लग्नसराईचे दिवस आनंदाचे असतात, पण याच आनंदावर विरझण घालणारी एक अतिशय दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन परतणाऱ्या एका व्हॅनचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पवनी तालुक्यातील सौंदड गावाजवळ हा अपघात घडला. मृतांमध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश असून, या घटनेमुळे संपूर्ण अड्याळ गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अड्याळ येथील नऊ वऱ्हाडी कोंढा येथे एका विवाह सोहळ्यासाठी गेले होते. विवाह आटोपून सर्वजण व्हॅनने आनंदाने आपल्या गावाकडे, म्हणजेच अड्याळकडे परतत होते. व्हॅन सौंदड गावाजवळ आली असता, अचानक गाडीचा टायर फुटला. टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही भरधाव व्हॅन समोरून येणाऱ्या एका ट्रेलरवर जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की व्हॅनचा अक्षरशः चक्काचूर झाला. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश या व्हॅनमध्ये एकूण ९ प्रवासी प्रवास करत होते. अपघाताच्या भीषणतेमुळे पाच जणांनी जागीच प्राण गमावले. मृतांमध्ये एक पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. या भीषण धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले असून अन्य दोन जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आणि अड्याळ पोलिसांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. गंभीर जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर किरकोळ जखमींवर अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती स्थिर राहावी यासाठी डॉक्टरांचे पथक प्रयत्न करत आहे. गावावर पसरली शोककळा अड्याळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. लग्नाचा सोहळा आटोपून सुखरूप घरी परतणाऱ्या वऱ्हाड्यांना अशा प्रकारे काळाने गाठावे, या विचारानेच हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टायर फुटल्याने हा अनर्थ ओढवला. अड्याळ पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, ट्रेलर चालकाची आणि अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे. पोलिसांकडून तपास सुरू अपघाताची माहिती मिळताच सौंदड परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली आणि अडकलेल्या वऱ्हाड्यांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मदत केली. अड्याळ पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून अपघाताच्या वेळी व्हॅनचा वेग किती होता आणि ट्रेलरची स्थिती काय होती, याचा तपास पोलिस करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *