![]()
स्वतःला धर्मगुरू म्हणवून घेणाऱ्या आणि आध्यात्मिक उपचारांच्या बहाण्याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या अशोक कुमार एकनाथ खरात ऊर्फ ‘कॅप्टन’ याला अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुंबईतून अटक केली आहे. ईडीच्या मुंबई आंचलिक कार्यालयाने मनी लॉन्ड्रिंग आणि कथित खंडणी प्रकरणाच्या चौकशीनंतर ही मोठी कारवाई केली. आरोपी खरातला १९ मे २०२६ रोजी धन शोधन निवारण कायद्यांतर्गत अटक करण्यात आली असून, मुंबईच्या विशेष न्यायालयाने त्याला २६ मे २०२६ पर्यंत ७ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. ही माहिती ईडीने आज त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून दिली आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अशोक खरात हा केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात गुंतलेला नव्हता, तर या पवित्र क्षेत्राच्या आडून तो एक अत्यंत पद्धतशीर आणि संघटित खंडणीचे रॅकेट चालवत होता. भोळ्याभाबड्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढून, त्यांच्या मनात विविध भीती निर्माण करून तो त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळत असल्याचे तपासात उघड झाले आहे. या अवैध आर्थिक व्यवहारांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी ईडीने मागच्या एका महिन्यात आक्रमक पावले उचलली आहेत. महिनाभरात अनेक ठिकाणी छापे; हाती लागले घबाड या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने १३ आणि १४ एप्रिल, १७ एप्रिल, २३ एप्रिल, ५ मे आणि १८ मे २०२६ रोजी आरोपी अशोक खरात आणि त्याच्या निकटवर्तीयांच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर एकापाठोपाठ एक धाडी टाकल्या. या प्रदीर्घ शोध मोहिमेमध्ये ईडीच्या हाती मोठे घबाड आणि महत्त्वाची कागदपत्रे लागली आहेत. छाप्यात तब्बल १३.९२ कोटी रुपयांची थेट रोकड आणि ५,५०० अमेरिकन डॉलर्स जप्त करण्यात आले आहेत. सुमारे १.१२ कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून, विविध बँकांमधील २.२५ कोटी रुपयांची रोकड फ्रीज (गोठवण्यात) करण्यात आली आहे. गुन्ह्याच्या पैशातून खरेदी केलेली एक अत्यंत महागडी ‘मर्सिडीज बेंज’ कार जप्त करण्यात आली असून अनेक बेनामी मालमत्तांचे रेकॉर्ड आणि डिजिटल उपकरणे ईडीने ताब्यात घेतली आहेत. आर्थिक जाळ्याचा सखोल तपास सुरू अशोक खरात याने धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रमांचा बुरखा पांघरून नेमकी किती संपत्ती बेकायदेशीर मार्गाने गोळा केली, याचा अंतिम आकडा शोधण्याचे मोठे आव्हान आता ईडीसमोर आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये त्याचे आर्थिक व्यवहार कोणाकोणाशी झाले, गोळा केलेला पैसा कुठे गुंतवला गेला आणि या खंडणी बहाद्दर बाबाच्या मागे आणखी कोणत्या बड्या प्रस्थांचा हात आहे का, या दिशेने ईडीचे अधिकारी आता खरातची कसून चौकशी करत आहेत. आगामी काळात या चौकशीतून आणखी काही धक्कादायक नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रूपाली चाकणकर यांचीही झाली चौकशी या हायप्रोफाईल प्रकरणाचे धागेदोरे राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे. ईडीने या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचीही कसून चौकशी केली आहे. खरात प्रकरणात नाव आल्यामुळे रूपाली चाकणकरांना सुरुवातीला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि त्यानंतर पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. खरातच्या बँक लॉकरमध्ये सापडलेले अफाट सोने, परदेशी चलन, महागड्या गाड्या, बंगले आणि फार्महाऊसच्या खरेदीत आणखी कोणत्या बड्या प्रस्थांचा आणि राजकीय नेत्यांचा वरदहस्त आहे, याचा सखोल तपास आता ईडी करत आहे.
Source link
भोंदू अशोक खरातला ईडीकडून अटक:तब्बल 13.92 कोटींची रोकड, मर्सिडीज कार आणि किलोभर सोने-चांदीचे दागिने जप्त