![]()
महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा आणि शहरी विकासाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी राज्य सरकारने मोठे उद्दिष्ट निश्चित केले आहे. पुढील 5 वर्षांत राज्यात पायाभूत सुविधा क्षेत्रात 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित करण्याचे नियोजन असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शहरीकरण ही समस्या नसून आर्थिक आणि सामाजिक विकासाची मोठी संधी आहे. त्यामुळे शहरांकडे ओझे म्हणून न पाहता आर्थिक विकासाची इंजिने म्हणून पाहण्याची गरज आहे. नियोजनबद्ध, शाश्वत आणि नागरिककेंद्रित शहरांची निर्मिती केल्यास राज्याच्या विकासाला मोठी गती मिळेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. मुंबई येथे आयोजित तिसऱ्या जागतिक महापौर परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास राज्यमंत्री तोखन साहू, हिमाचल प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमादित्य सिंह, पश्चिम बंगालचे राज्यमंत्री उमेश राय, मुंबईच्या महापौर रितू तावडे, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण, महासंचालक जयराज पाठक, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य राजकिशोर मोदी यांच्यासह देश-विदेशातील महापौर, नगरप्रशासक, लोकप्रतिनिधी आणि शहरी विकास क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारतात यापूर्वी शहरीकरणाकडे समस्येच्या दृष्टिकोनातून पाहिले जात होते. शहरीकरण रोखण्याचा प्रयत्न झाला; मात्र त्यात यश आले नाही. उलट योग्य नियोजनाअभावी अनियोजित शहरे, झोपडपट्ट्या, अपुऱ्या नागरी सुविधा, पाणीटंचाई आणि कचरा व्यवस्थापनासारख्या समस्या निर्माण झाल्या. 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरीकरणाकडे विकासाची संधी म्हणून पाहण्याची भूमिका मांडली. त्यानंतर देशातील शहरी प्रशासन आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळाली. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये शहरांचा वाटा सुमारे 65 टक्के आहे. त्यामुळे शहरांचा विकास झाला, तर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळू शकते. मुंबई महानगर प्रदेशात 50 अब्ज डॉलरची गुंतवणूक मुंबई महानगर प्रदेशात गेल्या काही वर्षांत सुमारे 50 अब्ज डॉलरची गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत. या भागात 300 किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे मेट्रो नेटवर्क, रस्ते, उड्डाणपूल, बोगदे, पाणीपुरवठा योजना, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या सुविधांवर भर दिला जात आहे. शहरांचा विकास करताना केवळ इमारती आणि रस्ते उभारणे पुरेसे नाही, तर शाश्वतता, सक्षम वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांना राहण्यासाठी योग्य वातावरण या तीन बाबी महत्त्वाच्या आहेत. या आधारावरच भविष्यातील शहरांची उभारणी केली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. तिसरी आणि चौथी मुंबई विकसित करणार महाराष्ट्राच्या भविष्यातील शहरी विकासाचा आराखडा मांडताना मुख्यमंत्र्यांनी तिसरी आणि चौथी मुंबई विकसित करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती दिली. नवी मुंबई विमानतळ परिसरात तिसरी मुंबई आकाराला येत आहे. या परिसरात एज्यु-सिटी, स्पोर्ट्स सिटी, मेडि-सिटी, इनोव्हेशन सिटी आणि ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर सिटी अशा विविध संकल्पनांवर आधारित विकास करण्यात येणार आहे. शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय सेवा, संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक कंपन्यांच्या कार्यालयांसाठी स्वतंत्र परिसंस्था निर्माण केली जाणार आहे. या परिसरात सुमारे एक लाख विद्यार्थ्यांची क्षमता असलेली शैक्षणिक व्यवस्था उभारण्याचे नियोजन आहे. तसेच 12 जागतिक दर्जाच्या विद्यापीठांचे कॅम्पस विकसित केले जाणार आहेत. त्यापैकी सात विद्यापीठांनी कामकाज सुरू केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दुसरीकडे, विरार ते वाढवण परिसरात चौथी मुंबई विकसित करण्याची योजना आहे. वाढवण येथे देशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक बंदर उभारले जात असून, हे बंदर जागतिक स्तरावरील पहिल्या दहा मोठ्या बंदरांमध्ये स्थान मिळवेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. बुलेट ट्रेन आणि सुपर एक्स्प्रेस वेच्या माध्यमातून या परिसराला मुंबईशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे या भागात औद्योगिक, व्यावसायिक आणि नागरी विकासाच्या नव्या संधी निर्माण होतील, असेही त्यांनी नमूद केले. अटल सेतूमुळे प्रवासाचा वेळ कमी मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील दळणवळण व्यवस्थेत अटल सेतू महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सुमारे 22 किलोमीटर लांबीच्या या सागरी सेतूमुळे मुंबईहून नवी मुंबई विमानतळ परिसरात पोहोचण्याचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. सध्या सुमारे 40 मिनिटांत हा प्रवास करता येतो. पुढील वर्षी हा वेळ आणखी कमी होऊन सुमारे 30 मिनिटांत प्रवास पूर्ण करता येईल, असे त्यांनी सांगितले. राज्य सरकारकडून एकीकडे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या विद्यमान शहरांचे पुनरुज्जीवन आणि पुनर्विकास केला जात आहे, तर दुसरीकडे नव्या शहरांची निर्मितीही केली जात आहे. या दुहेरी धोरणातून राज्यातील नागरी विकासाला गती देण्याचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. गुंतवणुकीपेक्षा इच्छाशक्ती आणि नियोजन महत्त्वाचे शहरांच्या विकासासाठी मोठ्या आर्थिक गुंतवणुकीची गरज असली, तरी केवळ पैसा उपलब्ध असणे पुरेसे नाही. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती, ठाम निर्धार आणि योग्य नियोजन आवश्यक आहे. जागतिक स्तरावर पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल उपलब्ध आहे. मात्र, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी व्यवहार्य, दर्जेदार आणि योग्य पद्धतीने नियोजन केलेले प्रकल्प तयार असणे गरजेचे आहे. प्रकल्पांची आखणी चांगली असेल, तर गुंतवणूक आपोआप आकर्षित होते, असे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्राची 50 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या सुमारे 400 शहरांमध्ये राहते, तर उर्वरित लोकसंख्या सुमारे 40 हजार गावांमध्ये वास्तव्यास आहे. त्यामुळे शहरांमध्ये उत्तम राहणीमान, दर्जेदार नागरी सुविधा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यास राज्यातील निम्म्याहून अधिक लोकसंख्येच्या जीवनमानात सुधारणा करता येऊ शकते. शहरांच्या विकासाकडे केवळ बांधकाम किंवा पायाभूत सुविधांच्या दृष्टिकोनातून न पाहता नागरिकांच्या जीवनमानाशी जोडून पाहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. धारावीचे मुंबईतील नव्या व्यावसायिक केंद्रात रूपांतर मुंबईतील जुन्या वस्त्या आणि इमारतींचे पुनरुज्जीवन तसेच पुनर्विकास करण्यावर राज्य सरकार भर देत आहे. याचाच भाग म्हणून धारावी पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून धारावीतील रहिवाशांना सर्व आवश्यक नागरी सुविधांनी युक्त आणि सन्मानजनक घरे उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. सध्या मुंबईतील प्रमुख व्यावसायिक केंद्र म्हणून वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) ओळखले जाते. मात्र, आगामी काळात धारावीच्याही रूपाने मुंबईला आणखी एक महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र मिळणार आहे. पुढील दहा वर्षांत धारावीचे रूपांतर मुंबईतील नव्या व्यावसायिक केंद्रात होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. महापौर हे नागरिकांचे पहिले उत्तरदायी प्रतिनिधी आपण स्वतः नागपूरचे महापौर म्हणून काम केले असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांसमोरील आव्हानांची आपल्याला जाणीव आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता किंवा अन्य नागरी सुविधांबाबत नागरिकांना समस्या निर्माण झाल्यास ते सर्वप्रथम महापौर किंवा नगरसेवकांकडे अपेक्षेने पाहतात. त्यामुळे महापौरांची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असून त्यांना चोवीस तास नागरिकांच्या प्रश्नांसाठी सज्ज राहावे लागते. प्रत्येक शहराने इतर शहरांमधील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास करून त्यांची अंमलबजावणी करावी. इंदूर, अहमदाबाद आणि मुंबई यांसारख्या शहरांमध्ये राबविण्यात आलेल्या चांगल्या कार्यपद्धतींचा इतर शहरांना फायदा होऊ शकतो. प्रत्येक शहराने प्रत्येक वेळी नव्याने प्रयोग करण्याऐवजी यशस्वी मॉडेलचा स्वीकार करणे आवश्यक आहे. त्यातून शहरी प्रशासन अधिक सक्षम होईल आणि विकासकामांना गती मिळेल, असे आवाहन त्यांनी केले. जागतिक महापौर परिषदेतून मिळणाऱ्या सूचनांवर अंमलबजावणी करणार अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने गेल्या 100 वर्षांत शहरी प्रशासन, प्रशिक्षण, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची क्षमता बांधणी तसेच धोरणनिर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित जागतिक महापौर परिषदेला विशेष महत्त्व असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या परिषदेत देश-विदेशातील महापौर आणि शहरी विकास क्षेत्रातील तज्ज्ञांकडून विविध विषयांवर चर्चा होणार आहे. या चर्चांमधून आणि निष्कर्षांमधून समोर येणाऱ्या सूचना महाराष्ट्र शासनाला सादर कराव्यात. त्यावर सकारात्मक विचार करून आवश्यक त्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. यावेळी देशभरातील यशस्वी नागरी उपक्रम आणि उत्तम कार्यपद्धतींचे संकलन असलेल्या ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री तोखन साहू आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. जयराज पाठक यांनी प्रास्ताविकात परिषदेच्या आयोजनामागील भूमिका आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्याचा आढावा मांडला. देश-विदेशातील महापौर, नगरप्रशासक आणि शहरी विकास क्षेत्रातील प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत. हेही वाचा…. शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात!:सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा जोरदार प्रहार; 21 जून 2022 रोजी मूळ पक्ष कोणाचा हेच ठरवावे लागेल शिवसेना पक्ष-चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीने बुधवारी (25 नोव्हेंबर) अत्यंत निर्णायक वळण घेतले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर दोन्ही बाजूंचा मुख्य युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर, उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी प्रतियुक्तिवाद (रिजॉइंडर) करताना एकनाथ शिंदे गटाच्या ‘निवडणूकपूर्व युती’ आणि ‘विधानसभा कार्यकाळ समाप्ती’ या युक्तिवादांची चिरफाड केली. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीचा दाखला देत, “त्यावेळी तरी भाजप आणि राष्ट्रवादीची कोणती निवडणूकपूर्व युती होती? महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे, दादा भुसे आणि गुलाबराव पाटील अडीच वर्षे मंत्रिपद भोगत होते, तेव्हा त्यांना विचारधारा का आठवली नाही?” असा सणसणीत सवाल सिब्बल यांनी न्यायालयात उपस्थित केला. सविस्तर वाचा….
Source link
महाराष्ट्राच्या विकासाला मिळणार जागतिक गती:पुढील 5 वर्षांत पायाभूत सुविधांसाठी 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्दिष्ट