Headlines

महाराष्ट्र आणि गुजरातमधील गुंतवणूकदारांना गंडा घातल्याचे उघडकीस:42 जणांना 30 कोटींनी गंडवणारा गजाआड; मर्सिडीजमधून फिरायचा




स्वतःची खरी ओळख लपवण्यासाठी डोक्यावर विग आणि तीन वेगवेगळ्या बनावट नावांचा वापर करून तब्बल ३० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ५६ वर्षीय भामट्याला अटक करण्यात आली आहे. रोशन भूषण शेठ असे या आरोपीचे नाव असून, आर्थिक गुन्हे शाखेने त्याला गुजरातमधील वलसाड येथून बेड्या ठोकल्या. शेअर बाजारात गुंतवणुकीवर दरमहा ५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून त्याने महाराष्ट्र आणि गुजरातमधील ४२ जणांना गंडा घातला असून तो मर्सिडीजध्ये फिरायचा. एप्रिल महिन्यात कांदिवलीतील संजय हिरालाल शहा (६०) यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली. आपल्या कुटुंबाची १०.८१ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार त्यांनी केली आणि या महाठगाचे बिंग फुटले. २०२० मध्ये शेठने “इन्व्हेस्टोक’ नावाचे बनावट ट्रेडिंग ॲप बनवण्याच्या बहाण्याने शहा यांच्या इंजिनिअर मुलाशी मैत्री केली होती. सायन आणि माटुंगा येथील फ्लॅटवर तो गुंतवणूकदारांच्या बैठका घ्यायचा आणि बनावट एक्सेल शीट दाखवून लोकांचा विश्वास जिंकायचा. शेअर बाजारात पैसे गुंतवून दरमहा ५ टक्के निश्चित परतावा देण्याचे आमिष त्याने गुंतवणूकदारांना दाखवले. गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी त्याने सुरुवातीला खोटे नफा पत्रक दाखवले आणि नफा म्हणून ३.८ कोटी रुपये छोट्या हप्त्यांत परतही केले. मोठी रक्कम जमा झाल्यानंतर त्याने परतावा देणे बंद केले आणि तो फरार झाला. १४ महागडी घड्याळे जप्त लोकांच्या कष्टाच्या पैशांवर शेठने अतिशय आलिशान जीवनशैली जगली. पोलिसांनी त्याच्याकडून एक बीएमडब्ल्यू ,एक मर्सिडीज, एक महिंद्रा थार या ३ गाड्यांसह १४ महागडी घड्याळे, १.६७ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि १७ लाख रुपये रोख जप्त केले आहेत. तसेच, त्याच्या तीन निवासी मालमत्ताही सील करण्यात आल्या आहेत. ईओडब्ल्यूने या फसवणुकीतील इतर पीडितांना त्यांच्या गुंतवणुकीच्या तपशिलासह पुढे येण्याचे आवाहन केल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपीने 3 नावे बदलली रोशन शेठ अतिशय हुशार होता. त्याने काळानुसार तरुणपणात जयेश हसमुखभाई शहा, दिल्लीत राहुल अतुलभाई पारेख आणि मुंबईत रोशन भूषण शेठ अशी तीन नावे वापरली. तो नेहमी विग घालायचा. पोलिसांनी ३७ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. यात त्याच्या विगची देखभाल करणाऱ्या सलून कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. याच कर्मचाऱ्याच्या माहितीवरून पोलिसांना त्याची खरी ओळख पटवण्यास मदत झाली. पोलिसांनी हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांच्या वेशात जाऊन त्याला अटक केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *