![]()
देशाच्या सुरक्षेला आणि अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींवर महाराष्ट्र सरकारने मोठा प्रहार केला आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) तपासादरम्यान समोर आलेल्या गंभीर माहितीनंतर, राज्य सरकारने दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या तब्बल 114 ‘पीडीएफ मासिकांवर’ तत्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. तसेच, या सर्व देशविघातक साहित्याच्या जप्तीचे आदेशही राज्य सरकारकडून अधिकृतपणे जारी करण्यात आले आहेत. नेमके काय आहे प्रकरण? महाराष्ट्र राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाकडून (ATS) सातत्याने देशविघातक कृत्यांवर आणि संशयित हालचालींवर लक्ष ठेवले जाते. एटीएसच्या नुकत्याच झालेल्या सायबर तपास आणि विश्लेषणादरम्यान एक अतिशय धक्कादायक बाब उघडकीस आली होती. इंटरनेट, मेसेजिंग ॲप्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादाला चालना देणारे विविध लेख, प्रक्षोभक पोस्ट्स, ऑडिओ, व्हिडीओ आणि इतर इलेक्ट्रॉनिक व डिजिटल दस्तऐवज जाणीवपूर्वक प्रसारित केले जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. या डिजिटल साहित्यामुळे समाजातील तरुणांची माथी भडकवली जाण्याची आणि पर्यायाने देशाची एकता, अखंडता, सार्वभौमत्व व सुरक्षितता धोक्यात येण्याची दाट शक्यता होती. कोणत्या कायद्यांतर्गत झाली कारवाई? या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली आहेत. ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023’ च्या कलम 98 उप-कलम (1) अन्वये राज्य सरकारने 6 ऑगस्ट 2026 रोजी एक विशेष अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेद्वारे दहशतवादास चालना देणाऱ्या एकूण 114 पीडीएफ मॅगझिन्सवर जप्तीची कारवाई घोषित करण्यात आली आहे. बंदीचा नेमका अर्थ काय? या अधिसूचनेनुसार, आता खालीलपैकी कोणतीही कृती करणे हा गंभीर गुन्हा मानला जाईल.बंदी घातलेल्या या मासिकांचे कोणत्याही प्रकारे प्रकाशन करणे, ते छापणे किंवा त्यांचे वितरण करणे. मोबाईल, व्हॉट्सॲप, टेलिग्राम किंवा इतर कोणत्याही माध्यमातून या पीडीएफ फॉरवर्ड करणे किंवा शेअर करणे. हे साहित्य भौतिक (Physical/Print) स्वरूपात किंवा डिजिटल (मोबाईल, कॉम्प्युटर, हार्ड डिस्कमध्ये) स्वरूपात स्वतःकडे बाळगणे आणि साठवून ठेवणे. या साहित्याची विक्री करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी त्याचे प्रदर्शन करणे यांचा समावेश आहे. एटीएसने स्पष्ट इशारा दिला आहे की, या अधिसूचनेचे आणि नियमांचे उल्लंघन करून जर कोणी व्यक्ती हे बंदी घातलेले साहित्य बाळगताना किंवा प्रसारित करताना आढळल्यास, त्याच्याविरुद्ध अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांना एटीएसचे महत्त्वाचे आवाहन या कारवाईबरोबरच दहशतवादविरोधी पथकाने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोणत्याही नागरिकाने दहशतवादाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देणारे कोणतेही लेख, पोस्ट अथवा दस्तऐवज स्वतःकडे बाळगू नयेत आणि त्यांचा प्रसारही करू नये. तसेच, जर कोणाला असे साहित्य कुठेही आढळले किंवा एखादी व्यक्ती त्याचा प्रसार करत असल्याचे निदर्शनास आले, तर नागरिकांनी एक जबाबदार नागरिक म्हणून त्वरित पोलीस किंवा तपास यंत्रणांना याची माहिती द्यावी. अशी माहिती देणाऱ्या जागरूक नागरिकाचे नाव आणि ओळख पूर्णपणे गुप्त (Confidential) ठेवली जाईल, अशी ग्वाही एटीएसने आपल्या प्रेस नोटमध्ये दिली आहे. हेही वाचा… निवडणुका जिंकण्याची भाजपची पद्धत ‘फ्रॉड’:राज ठाकरेंचा आरोप, मोहन भागवतांच्या विद्यार्थी संवादावर म्हणाले- उशीर झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर असून, आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी राज्याची सद्यस्थिती, नाशिकमधील खड्डे, ‘नीट’ परीक्षेतील घोळ आणि जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून राज्य व केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “सगळी शहरे बर्बाद होत आहेत, तरीही तुम्ही भाजपच्या लोकांना निवडून देत असाल तर भोगा,” अशा शब्दांत त्यांनी नाशिककरांना आणि जनतेला खडेबोल सुनावले. सविस्तर वाचा
Source link
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय:दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या 114 PDF मासिकांवर बंदी; डिजिटल स्वरूपात ठेवले तरी होणार कारवाई