Headlines

माजी महिला सरपंचाची प्रियकराकडून निर्घृण हत्या:वारीला जाण्याच्या बहाण्याने नेले अन् गळा दाबला, भिवंडीतून आरोपीला अटक




कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथील माजी महिला सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे (वय 50) यांची त्यांच्या प्रियकराने लग्नाचा तगादा लावल्याच्या रागातून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हत्येनंतर पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने चक्क मृतदेह कारमध्ये लपवून तब्बल 350 किलोमीटरहून अधिक प्रवास केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा थरारक डाव फसला असून भिवंडी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच पुढील तपासासाठी हा गुन्हा आता शाहूवाडी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत सुरेखा न्यारे आणि आरोपी प्रकाश ऊर्फ बाबू आनंदा पाटील (वय 40) हे शिरगाव येथे एकाच गल्लीत समोरासमोर राहायला होते. सुमारे दीड वर्षांपूर्वी सुरेखा यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर दोन्ही कुटुंबांमधील जवळीक वाढली आणि त्यातून सुरेखा व प्रकाश यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर सुरेखा यांनी प्रकाशकडे वारंवार लग्नासाठी तगादा लावण्यास सुरुवात केली, मात्र प्रकाशला हे लग्न अजिबात मान्य नव्हते. पंढरपूरच्या वारीला नेण्याचे दाखवले आमिष लग्नाच्या या सततच्या तगाद्यातून कायमची सुटका मिळवण्यासाठी अखेर प्रकाशने सुरेखा यांच्या हत्येचा भयानक कट रचला. रविवारी, 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्याने सुरेखा यांना ‘आपण पंढरपूरच्या वारीला जाऊ’ असे आमिष दाखवून स्वतःच्या गाडीत बसवले. मात्र, त्यांना वारीला नेण्याऐवजी त्याने गावाबाहेरील लिंडोरी येथील एका जनावरांच्या गोठ्यात नेऊन तिथेच गळा दाबून त्यांची निर्घृण हत्या केली. मृतदेह समुद्रात फेकण्याचा होता डाव हत्येनंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून आरोपी प्रकाशने अत्यंत क्रूरपणे सुरेखा यांचा मृतदेह एका गोणीत भरला आणि स्वतःच्या इको गाडीच्या (MH 09 GZ 6815) डिकीत लपवला. या मृतदेहाची कायमची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मुंबई गाठून तो थेट समुद्रात फेकून देण्याचा भयानक कट रचला होता. त्यानुसार तो मृतदेह गाडीत घेऊन प्रवासाला निघाला. भाच्याने पोलिसांना दिली मामाच्या भयानक कृत्याची माहिती प्रवास करत सोमवारी सकाळी आरोपी भिवंडीतील कशेळी परिसरात पोहोचला. तिथे त्याने आपला भाचा संदेश मोरे याची भेट घेऊन त्याला खुनाची कबुली दिली आणि मृतदेह समुद्रात फेकण्यासाठी त्याची मदत मागितली. मामाचे हे भयंकर कृत्य ऐकून भाचा हादरून गेला. त्याने क्षणाचाही विलंब न लावता तातडीने नारपोली पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कदबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून गाडीची झडती घेतली. डिकीत सुरेखा यांचा मृतदेह आढळताच पोलिसांनी आरोपी प्रकाश पाटीलला तात्काळ बेड्या ठोकल्या. शाहूवाडी पोलिसांकडून पुढील तपास सुरू या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी सुरुवातीला ‘झिरो एफआयआर’ नोंदवला असून, आता पुढील तपासासाठी हे प्रकरण शाहूवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. मयत सुरेखा न्यारे या अडीच वर्षे त्यांच्या गावच्या सरपंच होत्या. त्यांच्या या निर्घृण हत्येमुळे शिरगावसह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, शाहूवाडी पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *