Headlines

मिशन ॲडमिशन:नागपूर विद्यापीठात एम.एस्सी. प्राणीशास्त्र सोबत रेशीमशेती पदविका; विद्यार्थ्यांना एकाच वेळी 2 अभ्यासक्रम पूर्ण करता येणार




राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून विद्यापीठात ‘एकात्मिक एम.एस्सी. प्राणीशास्त्र व रेशीमशेती पदविका’ हा दुहेरी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळी पदव्युत्तर पदवी आणि व्यावसायिक पदविका असे दोन्ही शिक्षण घेता येणार आहे, ज्यामुळे त्यांच्या करिअरला नवी दिशा मिळेल. विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या (स्वायत्त) प्रस्तावाला या अभ्यासक्रमासाठी मंजुरी मिळाली आहे. एम.एस्सी. प्राणीशास्त्र भाग-१ (सेमिस्टर १ व २) मध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी या एकात्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील. नियमित एम.एस्सी. अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांना एक वर्षाचा रेशीमशेती पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्याची संधी मिळेल. या दुहेरी अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना जैवविज्ञानाच्या पारंपरिक ज्ञानासोबतच थेट रोजगाराभिमुख कौशल्याची जोड मिळेल. यामुळे त्यांचा अतिरिक्त वेळ वाचेल आणि त्यांना एकाच कालावधीत दोन महत्त्वाच्या पदव्या मिळवता येतील. रेशीमशेती पदविका अभ्यासक्रमाचे संचालन विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर सेरिकल्चर अँड बायोरिसोर्स मॅनेजमेंट रिसर्च’ मार्फत केले जाईल. हा अभ्यासक्रम पूर्णपणे प्रात्यक्षिकांवर आधारित असेल. यात विद्यार्थ्यांना रेशीम अळी संगोपन, रेशीम उत्पादन आणि प्रक्रिया, आधुनिक रेशीमशेती तंत्रज्ञान आणि जैवसंसाधन व्यवस्थापन यांसारख्या तांत्रिक बाबींचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *