![]()
आगामी आषाढी वारीसाठी देहू येथील इंद्रायणी घाटाचा चेहरामोहरा बदलणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) वारकऱ्यांच्या सोयीसाठी १३.०८ कोटी रुपयांच्या घाट विकासकामांची युद्धपातळीवर तयारी करत आहे. देहू नगरपंचायतीच्या मागणीनुसार इंद्रायणी नदीकाठी कापूर ओढा ते जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिर घाट या दरम्यान ही कामे सुरू आहेत. या कामांची प्रत्यक्ष पाहणी महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी केली. त्यांनी कामाच्या प्रगतीचा सखोल आढावा घेतला. वारीदरम्यान वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी भूसंपादन आणि जोडरस्त्याचे प्रलंबित प्रश्न देहू संस्थान व स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून तातडीने सोडवण्याचे निर्देश त्यांनी दिले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत ऐतिहासिक वारसा जपत जुन्या घाटाशी सुसंगत दगडी काम, सुबक पाथ-वे, भक्कम घाट, आधुनिक विद्युत व्यवस्था, सुशोभीकरण, स्वच्छतागृह आणि भाविकांसाठी दोन ठिकाणी सुनियोजित पार्किंग व्यवस्था यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत, घाटाचे १०० मीटरपर्यंतचे भरावाचे काम आणि नदीपात्रातील संरक्षणभिंतीचे काम वेगाने सुरू आहे. कामाच्या ओघात समोर आलेले तांत्रिक अडथळे आणि भूसंपादनाशी संबंधित स्थानिक प्रश्न तातडीने सामोपचाराने मार्गी लावण्याचे निर्देश महानगर आयुक्तांनी दिले. डॉ. चौधरी यांनी देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांना खासगी जागामालकांशी समन्वय साधून तसेच देहू संस्थानशी चर्चा करून रखडलेली जागा व जोडरस्ता लवकरात लवकर उपलब्ध करून घेण्यास सांगितले, जेणेकरून पावसाळ्यानंतर प्रकल्पाचे उर्वरित काम अधिक गतीने पूर्ण करता येईल. या विकासकामांमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यावरही ‘पीएमआरडीए’ने भर दिला आहे. वृक्षसंवर्धन समितीने ३० एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या परवानगीनुसारच आवश्यक तेवढीच झाडे तोडण्यात यावीत, आणि कोणत्याही परिस्थितीत पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना महानगर आयुक्तांनी संबंधित विभागाला दिल्या.
Source link
आषाढी वारी:देहू, इंद्रायणी घाटाचा चेहरामोहरा बदलणार; आषाढी वारीसाठी 'पीएमआरडीए'ची 13.08 कोटींच्या कामांची तयारी