Headlines

धडाडीचा नेता हरपला:पुणे झेडपीचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; विद्यार्थी संघटना, युवक काँग्रेसच्या चळवळीतून आले होते पुढे




पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि धडाडीचे नेते जालिंदर कामठे यांचे बुधवारी निधन झाले. हवेली तालुक्यातील कोंढवा हे त्यांचे मूळ गाव होते. त्यांच्या निधनाने पुणे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. कामठे यांनी विद्यार्थी संघटना आणि युवक काँग्रेसच्या चळवळीतून राजकारणात प्रवेश केला होता. पुणे विद्यापीठातील त्यांच्या अनेक आंदोलनांनी जिल्हा गाजवला होता. १९९७ मध्ये ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर, १९९९ ते २००२ या काळात त्यांनी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. कामठे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. रामकृष्ण मोरे यांचे खंदे समर्थक होते. त्यांच्या पत्नी जयश्री कामठे यांनीही १९९२ ते १९९८ दरम्यान जिल्हा परिषद सदस्या आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून काम केले आहे. कामठे यांनी हवेली आणि पुरंदर तालुक्यात मोठे राजकीय वर्चस्व निर्माण केले होते. स्वर्गीय वसंतदादा पाटील यांना ते गुरुस्थानी मानत असत. त्यांच्या नावाने कामठे यांनी कोंढवा येथे एक शाळाही सुरू केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी त्यांनी शरद पवार यांना खंबीर साथ दिली. पवारांच्या समर्थकांची पहिली ऐतिहासिक बैठक कामठे यांच्या क्वीन्स गार्डन येथील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय बंगल्यावर झाली होती. काही काळ त्यांनी भाजपमध्येही काम केले, मात्र दीड वर्षांपूर्वी त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. जंगली महाराज रस्त्यावरील त्यांचा ‘मथुरा’ आणि ‘सुभद्रा कट्टा’ हा गेली ४० वर्षे पुणे आणि राज्यातील राजकीय-सामाजिक घडामोडींचा मुख्य केंद्रबिंदू राहिला आहे. त्यांच्या निधनाने पुणे जिल्ह्याने एक अष्टपैलू नेतृत्व गमावले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *