![]()
मुंबईच्या पूर्व उपनगरातील नाहूर येथे एका विवाह सोहळ्यात जेवण केल्यानंतर सुमारे १०० पाहुण्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने जेवणाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले असून, भांडूप पोलिस केटररविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवत आहेत. नाहूर येथे रविवारी आयोजित या लग्नकार्यासाठी ४०० ते ५०० पाहुणे उपस्थित होते. विवाह सोहळा संपताना शेवटच्या पंगतीत ज्यांनी जेवण केले, त्यांना काही वेळातच उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा तीव्र त्रास सुरू झाला. तीन रुग्णालयांत उपचार सुरू; मुलांचाही समावेश त्रास वाढू लागल्याने बाधित नागरिकांना तातडीने नजीकच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले. बाधित १०० पैकी २२ जणांना मुलुंडच्या अगरवाल रुग्णालयात, ४ लहान मुलांना कामगार रुग्णालयात, तर ५ जणांना विक्रोळीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून, ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. शेवटच्या पंगतीतील अन्नच घातक का ठरते? सुरुवातीच्या पाहुण्यांऐवजी शेवटच्या पंगतीतील लोकांनाच विषबाधा झाली, कारण अन्न तासन्तास सामान्य तापमानात उघडे राहिले. अशा स्थितीत ‘बॅसिलस सेरिअस’ किंवा ‘स्टॅफिलोकोकस’सारखे जिवाणू वेगाने वाढतात. गरम अन्न दीर्घकाळ झाकून न ठेवल्याने आणि पुन्हा गरम न करता वाढल्यामुळे अन्नात विषारी घटक तयार होऊ शकतात. विषबाधेत सामान्यतः ४ ते सहा तासांमध्ये मळमळ वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, “समारंभातील अन्नातून होणाऱ्या विषबाधेत सामान्यतः ४ ते ६ तासांत मळमळ, उलट्या, पोटात मुरडा येणे आणि जुलाब ही लक्षणे दिसतात. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे हा यातील मुख्य धोका असतो. अशा वेळी रुग्णाला ओआरएस किंवा इलेक्ट्रोलाइट्सचे पाणी देणे सर्वात महत्त्वाचे ठरते. घरगुती औषधोपचार न करता तातडीने डॉक्टरांकडे जाणे आवश्यक असते.’
Source link
मुंबईत लग्नाच्या शेवटच्या पंगतीत जेवलेल्यांना 100 जणांना उलट्या:केटररवर गुन्हा दाखल, विवाह सोहळ्यासाठी 500 पाहुण्यांची हजेरी