![]()
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्याविरोधात बोलणे मंत्री नितेश राणे यांना चांगलेच महागात पडले आहे. राऊत यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यात माझगाव कोर्टाने राणे यांच्याविरोधात वॉरंट काढले आहे. विशेष म्हणजे कणकवली पोलिसांनी तब्बल तीन महिने हे वॉरंट राणेंना दिलेच नाही. त्यामुळे संतप्त कोर्टाने आता थेट त्यांच्या मुंबईतील सरकारी निवासस्थानी वॉरंट पाठवण्याचे आदेश दिले आहेत. मे २०२३ मधील एका पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी मोठा दावा केला होता. “संजय राऊत १० जूनपूर्वी राष्ट्रवादीत जाणार असून अजित पवारांना बाहेर काढण्याच्या अटीवर त्यांच्या बैठका सुरू आहेत,” असा आरोप त्यांनी केला होता. या विधानामुळे आपली नाहक बदनामी झाल्याचे सांगत राऊत यांनी माझगाव कोर्टात धाव घेतली होती. या खटल्याच्या तारखांना नितेश राणे वारंवार गैरहजर राहिले. त्यामुळे कोर्टाने सुरुवातीला त्यांच्या कणकवलीतील पत्त्यावर वॉरंट पाठवले. मात्र, स्थानिक पोलिसांनी तीन महिने ते राणेंपर्यंत पोहोचवलेच नाही. राऊतांच्या वकिलांनी ही बाब कोर्टाच्या लक्षात आणून दिली. त्यावर नाराजी व्यक्त करत कोर्टाने पत्ता बदलून थेट मुंबईतील सरकारी बंगल्यावर वॉरंट बजावण्याचे आदेश दिले. आता राणे कोर्टात हजर राहतात की हायकोर्टात धाव घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Source link
राऊतांवर वक्तव्य भोवले:मंत्री नितेश राणेंविरोधात वॉरंट