Headlines

जरंडीत ऑक्सिजन देणाऱ्या वनस्पतींची लागवड:हुतात्मा स्मारकात वृक्षलागवडीसाठी नागरिकांनी घेतला पुढाकार




वाढती वृक्षतोड, अनियंत्रित शहरीकरण आणि वाहनांमधून निघणारा धूर व धूळ यामुळे वायू प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या बदलत्या पर्यावरणाचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होत असून, लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांना श्वसनाचे विकार आणि विविध प्रकारच्या ॲलर्जीचा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सोयगाव तालुक्यातील जरंडी ग्रामपंचायतीने हुतात्मा स्मारक परिसरात विविध प्रकारच्या हवा शुद्ध करणाऱ्या वनस्पतींची लागवड केली आहे. ग्रामपंचायतीच्या उपक्रमामुळे स्मारकाच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच एका हरित परिसराच्या निर्मितीला मोठी चालना मिळाली आहे. हुतात्मा स्मारकातील उद्यानात स्नेक प्लांट, एरेका पाम, मनी प्लांट, कोरफड, स्पायडर प्लांट आणि पीस लिली यांसारख्या विविध प्रकारच्या उपयुक्त वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. अत्यंत कमी देखभालीत आणि कमी पाण्यात सहज वाढणाऱ्या या वनस्पतींमुळे स्मारक परिसर हिरवागार आणि प्रसन्न दिसत असून, एक पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न जरंडी ग्रामपंचायतीने केला आहे. विशेषतः घरातील आणि बंदिस्त जागांमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अशा प्रकारच्या वनस्पती कशा उपयुक्त ठरू शकतात, याबाबतही या उपक्रमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. वाढत्या प्रदूषणाच्या या गंभीर पार्श्वभूमीवर केवळ शासनावर किंवा प्रशासनावर अवलंबून न राहता प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनाच्या या कार्यात स्वतःहून सहभाग घेणे काळाची गरज आहे. नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात तसेच उपलब्ध असलेल्या छोट्या-मोठ्या जागेत विविध प्रकारची हिरवी झाडे लावून त्यांचे नियमित संगोपन करावे, असे आवाहनाचे पत्र ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व ग्रामस्थांना करण्यात आले आहे. या नैसर्गिक हरित पट्ट्यामुळे स्मारकाच्या वैभवात आणि सौंदर्यात मोठी भर पडली असून सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. नागरिकांनी विविध वृक्षांचे संगोपन करावे सध्याच्या धावपळीच्या आणि प्रदूषित वातावरणात घरातील हवेची गुणवत्ता सुधारणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे हुतात्मा स्मारकाच्या घनदाट उद्यानात स्नेक प्लांट, एरेका पाम आणि कोरफड यांसारख्या वनस्पतींची विशेष लागवड केली आहे. सर्व नागरिकांनीही श्वसनाच्या तक्रारी आणि ॲलर्जी टाळण्यासाठी परिसराच्या स्वच्छतेसोबतच आपल्या घरात व आसपासच्या परिसरात हिरवी झाडे लावून त्यांचे मनापासून संगोपन करावे, असे आवाहन ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *