Headlines

राज्यात पावसाचा लपंडाव सुरूच!:कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा, विदर्भ-मराठवाड्यात ढगाळ वातावरणाचा अंदाज




महाराष्ट्रामध्ये परतीच्या मान्सूनचा प्रभाव अजूनही कायम असून, राज्याच्या हवामानात सध्या मोठे बदल पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याने कडक ऊन पडत आहे, तर काही भागांत पावसासाठी पुन्हा पोषक वातावरण तयार झाले आहे. आज, ३० सप्टेंबर रोजी हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देत ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. कुठे पाऊस, कुठे उन्हाचा चटका? पावसाने विश्रांती घेतलेल्या राज्याच्या अनेक भागांमध्ये दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढला आहे. गेल्या २४ तासांत अमरावतीमध्ये राज्यातील सर्वाधिक तापमानाची (३६.४ अंश सेल्सिअस) नोंद झाली आहे. याउलट महाबळेश्वरमध्ये नीचांकी १७.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. काही ठिकाणी पहाटेच्या वेळी धुके आणि दव पडत असल्याचेही चित्र आहे. गेल्या चोवीस तासांत संगमनेर, सांगोला, कळंब आणि शिरूर कासार या भागात प्रत्येकी ३० मिलीमीटर पावसाची हजेरी पाहायला मिळाली. हवामानात बदल का होत आहे? सध्या राज्यातील हवामानावर विविध प्रणालींचा प्रभाव दिसून येत आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रात समुद्रसपाटीपासून दीड ते साडेचार किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. याशिवाय, दक्षिण तेलंगणापासून तमिळनाडूपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरात म्यानमारजवळ तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता उत्तरेकडे सरकत असून ते बांगलादेशच्या किनाऱ्यावर विरून जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. देशातून मान्सूनच्या परतीचा प्रवास नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागातून आपला काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या बहुतांश भागांतून, तसेच उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या काही भागांतून मॉन्सूनने माघार घेतली आहे. आजचे हवामान कसे राहील? हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. येलो अलर्ट असलेल्या सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि साताऱ्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे, मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रात आज ढगाळ वातावरण राहील आणि दिवसभर ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहील. उपग्रह नकाशावर मान्सूनी ढगांची स्थिती पाहा हेही वाचा.. बिहारच्या मोतिहारीत 5 हजार घरांत पाणी:17 जिल्ह्यांना पुराचा इशारा; यूपीच्या गल्लीबोळांत नौका, आंध्र प्रदेशात धुक्याची चादर गंडक नदीची पाण्याची पातळी वाढल्यामुळे बिहारच्या पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, गोपालगंज, सारण, मुझफ्फरपूर आणि वैशालीच्या सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे 20 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. मोतिहारीमध्ये 5 हजार घरे पाण्याने वेढली गेली आहेत. पुरामुळे 25 हून अधिक शाळा बंद आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्यातील 17 जिल्ह्यांना पुराचा इशारा जारी केला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *