Headlines

राहुरीमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश अन् शिस्तबद्ध मिरवणूक:गणरायाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला




राहुरी शहरात त्याचबरोबर ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये गणेश विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये गणपती बाप्पाचा जयजयकार आणि गुलालाची उधळण करत ग्रामीण भागातील त्याचबरोबर शहरातील विविध मोठ्या गणेश मंडळांनी या मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वाद्यांच्या निनादात तसेच गणरायाच्या जयघोषात शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये तरुण मंडळांचा उत्साह आणि युवकांचा सहभाग होता. राहुरी नगरपरिषदेच्यावतीने नावघाट येथे कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली होती. पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश विसर्जन व्हावे यासाठी गणेश मंडळांसह घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी या कृत्रिम तलावाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. दिवसभर या ठिकाणी गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या विसर्जन सोहळ्याप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार प्राजक्त तनपुरे उपस्थित होते. त्यांनी गणेश विसर्जनासाठी आलेल्या गणेश भक्तांची भेट घेत त्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. गणपती बाप्पाला निरोप देताना अनेक भक्तांच्या चेहऱ्यावर भक्तिभाव आणि भावूकता दिसून येत होती. “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात गणरायाला निरोप देण्यात आला. राहुरी शहराससह तालुक्यात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी प्रशासन व पोलिसांकडून आवश्यक नियोजन करण्यात आले होते. नागरिकांनीही शांतता, शिस्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश विसर्जन करून प्रशासनाला सहकार्य केले. राहुरी शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी गणेश विसर्जन अत्यंत शांततेत उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात पार पडले. पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष दिवसभर सुरू होता. लहानांपासून अगदी वृद्धांपर्यंत प्रत्येक जण या सोहळ्यात सहभागी झाला होता. दहा दिवस गणरायाचे पूजन, आरती केली. पण आज त्याच गणरायाला निरोप देण्याची वेळ आल्याने अनेकांचे डोळे पाणावले होते. परंतु, पुढल्या वर्षी लवकर या असे म्हणत गणरायाच्या आगमनाची आतुरताही दिसत होती. पारंपारिक वाद्यांवर राहुरीकरांचा भर गणेशोत्सवात यंदा डीजे आणि अन्य कर्णकर्कश वाद्यांऐवजी पारंपारिक वाद्यांवर भर देण्यात आला होता. त्यामुळे कुठे लेझीम, झांजेचा ताल तर कुठे ढोल अन् ताशांचा निनाद कानावर पडत होता. या पारंपारिक वाद्यांचा गजर आणि सोबत लाडक्या बाप्पाचा जयघोष यांमुळे आसमंत दुमदुमून गेला होता. राहुरीत ठिकठिकाणी असे आल्हाददायक चित्र पाहण्यास मिळाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *