![]()
राज्यात पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत राज्यातील २६५ हून अधिक तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ नुसार दुष्काळ जाहीर केला आहे. सरकारच्या या तत्पर निर्णयाचे स्वागत करत राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. “महाविकास आघाडीने त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात जनतेला काहीच दिले नाही, मात्र आमचे सरकार कर्जमाफीपासून ते दुष्काळापर्यंत प्रत्येक संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” असा दावा त्यांनी केला. ‘मविआने कोविडमध्ये वाऱ्यावर सोडले’ माध्यमांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवर थेट हल्लाबोल केला. ते म्हणाले, “महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात त्यांनी लोकांना दिलेच काय? कोविडसारख्या महाभयंकर संकटात माणसं उद्ध्वस्त झाली, लोकांचे संसार उघड्यावर पडले, पण त्या सरकारने जनतेला एका रुपयाचीही मदत केली नाही.” असा गंभीर आरोप करत त्यांनी मविआच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. ‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री थेट बांधावर’ विद्यमान सरकारच्या कामाचे कौतुक करताना विखे पाटील यांनी सांगितले की, हे सरकार प्रत्यक्ष कृती करणारे सरकार आहे. “संकट काळात आमचे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतः थेट बांधावर गेले आहेत. त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला आणि त्यांना धीर दिला आहे. वातानुकूलित दालनात न बसता हे सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करत आहे,” असे ते म्हणाले. अहिल्यानगरच्या १४ तालुक्यांना दिलासा राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीबाबत बोलताना ते म्हणाले की, “आज तातडीने पहिल्या ट्रिगरनुसार राज्यातले २०० हून अधिक तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले आहेत. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील १४ च्या १४ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.” शासनाने दुष्काळ जाहीर करण्यासाठी उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे असून, या निर्णयाबद्दल जिल्ह्यातील आणि राज्यातील सर्वच शेतकऱ्यांनी मोठे समाधान व्यक्त केल्याचेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी आवर्जून नमूद केले. —– ही बातमी वाचा.. महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर!:राज्याच्या 75 टक्के भागाला तातडीने दिलासा; कर्जवसुलीस स्थगिती, परीक्षा फी माफीसह मुख्यमंत्र्यांचे 12 मोठे निर्णय पावसाच्या मोठ्या खंडाने आणि अल निनोच्या प्रभावामुळे खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा व दिलासादायक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील 358 पैकी तब्बल 265 तालुक्यांमध्ये अधिकृतरीत्या कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. कृषी आयुक्तांच्या अहवालानुसार या तालुक्यांमध्ये दुष्काळाची पहिली कळ (Trigger-1) लागू झाली असून, महसूल व मदत-पुनर्वसन विभागाने याबाबतचा अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे. राज्यातील सुमारे ७५ टक्के भूभाग आता दुष्काळग्रस्त म्हणून घोषित झाला असून, शेतकऱ्यांसाठी सवलतींची घोषणा करण्यात आली आहे. सविस्तर वाचा
Source link
कर्जमाफी असो वा दुष्काळ, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी:विखे पाटलांचा मविआवर हल्लाबोल, अहिल्यानगरच्या सर्व 14 तालुक्यांना दिलासा