![]()
आपले लग्न लावून देत नाही, या गैरसमजातून धुळे तालुक्यात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. प्रदीप ऊर्फ दगडू खैरनार-पाटील (वय 45) या मद्यधुंद मुलाने आपली 65 वर्षीय वृद्ध आई जिजाबाई यांच्या अंगावर थिनर ओतून त्यांना जिवंत जाळले. उपचारादरम्यान या दुर्दैवी मातेची प्राणज्योत मालवली. पोलिसांनुसार, प्रदीप याचे अद्याप लग्न झालेले नव्हते. आईमुळेच आपले लग्न जमत नाही, असा त्याचा समज होता. शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास तो मद्यधुंद अवस्थेत घरी आला आणि आईशी हुज्जत घालू लागला. संतापाच्या भरात त्याने घरात रंगकामासाठी आणलेले थिनर आईच्या अंगावर ओतून त्यांना पेटवून दिले. यानंतर स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी प्रदीपने हा केवळ एक अपघात असल्याचा बनाव रचला.
त्याने स्वतःच्या रिक्षातून आईला रुग्णालयात दाखल केले आणि ‘आई अपघाताने जळाली’ असे सांगितले. तसेच मदतीसाठी देविदास हिवरकर या परिचिताला बोलावून घेतले. मात्र, रुग्णालयात वेदनेने तडफडणाऱ्या आईने हिवरकर यांच्यासमोर मुलाचे क्रूर कृत्य उघड केले. हिवरकर यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. रुग्णालयात तैनात पोलिस कॉन्स्टेबलने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वृद्ध मातेचा मृत्यूपूर्व जबाब मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. या तांत्रिक पुराव्यामुळे आरोपीचा खोटा बनाव उघड झाला. धुळे तालुका पोलिस ठाण्यात आरोपी मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. गुन्ह्यात वापरलेली रिक्षाही जप्त करण्यात आली आहे. मुलींनी दिला मुखाग्नी प्रदीपच्या वडिलांचे आणि एका भावाचे पूर्वीच निधन झाले आहे. जन्मदात्रीचे प्राण घेणाऱ्या या नराधम मुलाला अंत्यविधीसाठीही आणले गेले नाही. दोन विवाहित मुलींनीच आईला मुखाग्नी दिला.
Source link
लग्न करून देत नसल्याच्या गैरसमजातून धुळ्यात तरुणाने आईला जिवंत जाळले:मुलाकडून अपघाताचा बनाव, पण आईच्या मृत्यूपूर्व जबाबदातून सत्य उघड