![]()
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, यावेळी शिंदेंनी उद्धव ठाकरे व काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. लढायची वेळ येते तेव्हा कोणाला तरी पुढे करतात, अशी टीका शिंदे यांनी केली आहे. तसेच गोरगरीब, शोषित आणि दिव्यांगांच्या हितासाठी शिवसेना सदैव कार्यरत असल्याचे सांगत, त्यांनी बच्चू कडू यांच्या 25 वर्षांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला व त्यांच्या समावेशामुळे शिवसेना आणि कडू या दोघांचीही ताकद वाढेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान, विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 10च प्रमुख अर्ज आल्याने ही निवडणूक आता बिनविरोध होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेदवार न देण्याचे कारण अंतरआत्म्यातून आवाज आला असे कारण सांगितले. यावर एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आत्मा हरवलेल्या लोकांच्यातून आवाज येतो का? मी पहिल्यांदा ऐकले आहे, 2019 ला अंतरआत्मा कुठे होता? आत्मा हरवलेल्या लोकांच्या अंतरआत्म्यतून आवाज येतो का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात होणार पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक होत आहे. बिनविरोध निवडणूक होत आहे आणि त्यामुळे सर्व पक्षांचे देखील स्वागत केले पाहिजे. सर्व पक्षांना धन्यवाद दिले पाहिजेत. शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीने अधिकचा उमेदवार दिला नाही, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध आणि खेळीमेळीच्या वातावरणात होत आहे. उद्धव ठाकरेंवर टीका उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना उमेदवारी घोषित केली आहे. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, लढायची वेळ येते तेव्हा कोणाला तरी पुढे करतात. तुम लढो, हम कपडा संभालते है, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. मला यावर भाष्य करायचे नाही. सगळ्यांनी समंजसपणाची भूमिका घेतली, कॉंग्रेसने देखील समंजसपणाची भूमिका घेतली त्याबद्दल धन्यवाद.
Source link
लढायची वेळ आली की कोणाला तरी पुढे करतात:विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका