![]()
‘तो ती आणि फुजी’ हा चित्रपट जपानमधील सुंदर निसर्गचित्रांसाठी कौतुक मिळवत असला, तरी त्यातील घरगुती आणि शांत प्रसंगांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिक प्रभाव टाकला आहे. अशाच एका प्रसंगामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे, ज्यामध्ये एका साध्याशा कारणावरून नाते कशाप्रकारे टोकाला पोहोचते, याचे वास्तववादी चित्रण करण्यात आले आहे. तो प्रसंग एका तणावपूर्ण सायंकाळी घडतो, जिथे मुख्य अभिनेत्री कामावरून थकली-भागलेली घरी येते. तिला रात्रीच्या जेवणात पास्ता बनवून देण्याचे वचन दिलेले असते, पण ते तयार नसल्याचे तिला समजते. तिने स्वतः बनवलेला पास्ता अभिनेता त्याच्या निष्काळजीपणामुळे खाली सांडतो तेव्हा तिचा राग अनावर होतो. तिला आधार देण्याऐवजी किंवा आपली चूक मान्य करण्याऐवजी तो स्वतःचा बचाव करण्यासाठी वाद घालू लागतो. या प्रसंगामधून त्या दोघांमधील संवादाची कमतरता आणि जबाबदाऱ्यांचे असमान वाटप असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. ललित प्रभाकर यांच्यासाठी आपल्या जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करू न शकणाऱ्या पात्राची भूमिका साकारणे, हे सर्जनशील आव्हान आणि शिकण्याचा अनुभव दोन्ही होते. या प्रसंगाबद्दल सांगताना ते म्हणाले, “पास्ताचा तो प्रसंग चित्रपटातील सर्वात भावनिक क्षणांपैकी एक होता, कारण त्या क्षणामधून दिसून येते की एकमेकांवर प्रेम करणारे दोन व्यक्ती देखील आपल्या जोडीदाराला दुखावणारे शब्द बोलू शकतात किंवा तसे वागू शकतात. माझ्या भूमिकेचे त्याच्या वडिलांसोबतचे संबंध तणावपूर्ण राहिले आहेत. त्याला स्वतःला सिद्ध करण्याची तीव्र इच्छा आहे,
पण एका सुरक्षित वातावरणातून आल्यामुळे ते नेमके कसे करायचे हे त्याला समजत नाही. या प्रसंगातही त्याला तिची मनापासून काळजी आहे, म्हणून त्याने घर स्वच्छ केले आहे. पण पास्ता खाली सांडतो, तेव्हा तिच्या रागाचा उद्रेक का झाला, हे समजून घेण्यात तो कमी पडतो. उलट, ती संवादादरम्यान मुद्दाम त्याच्या वडिलांचा विषय काढते, तेव्हा तो दुखावला जातो. ते दोघेही वैयक्तिक, व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर एकमेकांवर असलेला दबाव ओळखण्यात अपयशी ठरतात. या सीनच्या शूटिंगने मला त्या संवादातील दरीवर विचार करायला लावले, जी अनेक जोडपी अनुभवतात पण त्याबद्दल बोलत नाहीत. त्या बंदिस्त जागेत तिचा थकवा आणि त्याचा बचावात्मक पवित्रा यांमधील विरोधाभास स्पष्टपणे जाणवतो.” रोचक बाब म्हणजे, ललित यांचे खऱ्या आयुष्यातील स्वयंपाकासोबतचे नाते त्यांच्या भूमिकेपेक्षा अगदी वेगळे आहे. स्वतःला ते प्रोफेशनल मानत नसले तरी स्वयंपाक करणे ही त्यांच्यासाठी केवळ एक घरगुती जबाबदारी नसून मनःशांती देणारी आणि एकाग्रता वाढवणारी क्रिया आहे. मोहित टाकळकर दिग्दर्शित ‘तो ती आणि फुजी’ हा चित्रपट प्रादेशिक सिनेमातील महत्त्वपूर्ण भर आहे. सोनी लिव्हवर नुकताच हाच चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ही कथा मृण्मयी गोडबोले आणि ललित प्रभाकर यांनी साकारलेल्या भूमिकांच्या नात्यावर आधारित आहे, जे एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात वेडे होते, पण काळासह त्यांच्यातील अपेक्षा आणि भावनिक दुराव्यामुळे नात्यात तणाव निर्माण होतो. अनेक वर्षांनंतर जपानमध्ये त्यांची पुन्हा भेट होते, जिथे त्यांना जुन्या न सुटलेल्या भावनांचा आणि पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेचा सामना करावा लागतो.
Source link