![]()
सेनगाव तालुक्यातील लिंबाळा तांडा शिवारात दुचाकी व रोही प्राण्याच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 21 नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील ब्रम्हवाडी येथील आदिनाथ गडदे व त्यांचे वडील केशव गडदे (55) हे त्यांच्या दुचाकी वाहनावर गुरुवारी ता. 16 येलदरी येथे किराणा दुकानावर सामान आणण्यासाठी जात होते. यावेळी त्यांचे दुचाकी वाहन लिंबाळा तांडा शिवारात आल्यानंतर एका रोही प्राण्याने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात आदिनाथ यांचे दुचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. तर त्यांच्या पाठीमागे बसलेले केशव हे देखील गंभीर जखमी झाले. या अपघातात दुचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरीकांनी आदिनाथ व केशव यांना तातडीने उपचारासाठी परभणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मागील चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र मागील दोन दिवसांत त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली. डॉक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र उपचार सुरु असतांना केशव गडदे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दिनकर गडदे यांच्या माहितीवरून सेनगाव पोलिस ठाण्यात आदिनाथ गडदे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक दीपक मस्के, जमादार पवन चाटसे, सुभाष चव्हाण यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, सेनगाव, हिंगोली तालुक्यात वन्य प्राण्यांची संख्या वाढली असून सकाळी व सायंकाळच्या सुमारास रोही प्राण्याचे कळप मुख्य रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात. त्यातून दुचाकी व चारचाकी वाहनाला धडक होत असल्याच्या घटनाही घडल्या आहे. त्यामुळे दुचाकी वाहन चालकांनी वाहने चालवितांना हेल्मेटचा वापर करावा तसेच वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवावे असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के यांनी केले आहे.
Source link
लिंबाळा तांडा शिवारात रोहीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू:एक गंभीर जखमी, सेनगाव तालुक्यातील घटना