![]()
प्रतिनिधी |राहुरी राहुरी नगरपरिषदेच्या सुस्त कारभारावर माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी कडक शब्दांत ओढले ओढले. प्रलंबित विकासकामे तातडीने मार्गी लावा आणि जनतेची कामे विनाविलंब करा. लोकांना कामासाठी हेलपाटे मारायला लावले, तर ते खपवून घेतले जाणार नाही, अशा शब्दांत त्यांनी अधिकारी आणि नगरसेवकांना सुनावले. राहुरी नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्षांच्या दालनासमोर मोकळ्या जागेत खुर्च्या टाकून तनपुरे यांनी बैठक घेतली. मुख्याधिकारी अभिजित हराळे, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, गटनेते हर्ष तनपुरे, पालिकेतील विरोधी पक्षनेते अरुण साळवे, नगरसेवक चंद्रकांत उर्फ राजेंद्र उंडे, अविनाश म्हस्के, शहाजी ठाकूर, नीलेश जगधने, आरिफ शेख उपस्थित होते. तनपुरे यांनी नगरपरिषदेच्या विविध खात्यांच्या खाते प्रमुखांना बोलावून त्यांच्या संदर्भातील कामकाजाचा आढावा घेतला. मुळा धरण येथील पिण्याच्या पाणी योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम चालू एप्रिल महिना अखेर पूर्ण करावे. जेणेकरून एक मे पासून पाणी योजनेचे वीजबिल बचतीला सुरू होईल. नगरपरिषद हद्दीतील झाडांची गणना करून कार्बन क्रेडिट मिळविण्याचा प्रयत्न करावा. भूमिगत गटार योजनेच्या एचटीपी प्लांटची प्रलंबित कामे युद्धपातळीवर मार्गी लागावी. १ जून रोजी एचटीपी प्लांट कार्यान्वित करून शहरातील गटारीचे निम्मे पाणी शुद्धीकरणास सुरुवात करावी. राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूच्या गटारीच्या पाण्याच्या जलवाहिन्या एचटीपी प्लांटला जोडाव्यात. हे काम तीन महिन्यात पूर्ण करून भूमिगत गटार योजना पूर्ण क्षमतेने सुरू करावी. नगरपरिषद इमारतीला आतून रंगकाम करावे. थकित कर वसुलीला प्राधान्य द्यावे. संगणकीकरणातील त्रुटी दूर कराव्यात. नागरिकांना थकीत कर भरण्यासाठी, जन्म-मृत्यूचे दाखले मिळण्यासाठी हेलपाटे मारावे लागू नयेत. प्रशासन गतिमान करावे. कार्यालयीन वेळेत कर्मचाऱ्यांनी गळ्यात ओळखपत्र घालावे. शिस्त बाळगावी, अशा सूचना तनपुरे यांनी दिल्या. राहुरी नगरपरिषद येथे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी भेट देऊन अधिकारी व नगरसेवक यांची झाडाझडती घेत जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यास सांगितले . आता बायोमेट्रिकचा वॉच नगरपरिषदेत कर्मचाऱ्यांच्या लेट-लतीफ कारभाराला चाप लावण्यासाठी आता बायोमेट्रिक मशीन बसवण्यात आले आहे. चेहरा किंवा बोटांच्या ठशाशिवाय हजेरी लागणार नसल्याने कर्मचाऱ्यांना वेळेत हजर राहावेच लागेल.
Source link
लोकांना हेलपाटे मारायला लावू नका, कामे तात्काळ मार्गी लावा:माजी खासदार प्रसाद तनपुरे यांची राहुरी नगर पालिकेत झाडाझडती