![]()
तुमचे कर्मचारी वसुलीसाठी नाही तर मग काय कर्जदारांना कपडे देण्यासाठी आले काय अशा शब्दात क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी विदर्भातील एका फायनांन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना फटकारले. त्यानंतर त्यांच्या वसुली कर्मचाऱ्यालाही वाघजाळी (ता. सेनगाव) येथून हुसकावून लावले. हिंगोली जिल्ह्यात फायनांन्स कंपनीचे वसुली कर्मचारी अद्यापही कर्जदारांच्या घरी जाऊन वसुलीसाठी तगादा लावत आहेत. विशेष म्हणजे कर्ज वसुलीसाठी तगादा लाऊ नये असे शासनाचे स्पष्ट आदेश असतांनाही कर्मचारी गावात जात असल्याचे चित्र आहे. दरम्यान, सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथे मंगळवारी ता. 3 विदर्भातील नवीन संधी फायनांन्स कंपनीचा वसुली कर्मचारी गावात आला होता. या कर्मचाऱ्याने बचतगटातील महिलांकडे कर्जाचे हप्ते भरण्याचा तगादा सुरु केला. त्यानंतर या प्रकाराची माहिती मिळताच क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी पदाधिकाऱ्यांसह वाघजाळी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी फायनांन्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला वसुलीबाबत जाब विचारला. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वसुलीसाठी पाठविल्याचे त्या कर्मचाऱ्याने सांगितल्यानंतर कावरखे यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. मात्र यावेळी संबंधित अधिकाऱ्याने आमचा कर्मचारी वसुलीसाठी आला होता काय तसेच तो उध्दट बोलला काय अशी विचारणा केली. यावर संतापलेल्या कावरखे यांनी संबंधित अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले. तुमचा कर्मचारी गावात वसुली साठी आला नाही तर मग काय कर्जदारांना दिवाळीचे कपडे देण्यासाठी आला होता काय असा सवाल केला. यानंतर कंपनीचा अधिकारी निरुत्तर झाला. त्यानंतर क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फायनांन्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यास यापुढे जिल्हयात कुठेही कर्ज वसुलीसाठी यायचे नाही असा सज्जड दम दिला. त्यानंतर त्याला गावातून हुसकावून लावण्यात आले. यापुढे कर्मचारी जिल्हयात फिरकल्यास त्याची माहिती तातडीने क्रांतीकारी शेतकरी संघटनेचा द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. ..तर गुन्हे दाखल करणार- कावरखे क्रांतीकारी शेतकरी संघटना मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे म्हणाले की, दुष्काळामुळे ग्रामीण अर्थकारण बिघडले आहे. शेतकरी, शेतमजूर, महिला बचतगटांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यानंतरही फायनांन्स कंपन्या कर्जवसुलीसाठी तगादा लावत असतील ते योग्य नाही. यापुढे कोणत्याही फायनांन्स कंपनीला वसुली कर्मचारी गावात वसुलीसाठी आल्यास त्याच्यावर गुन्हे दाखल करणार आहे. या शिवाय संबधित कंपनीला संघटना धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही.
Source link
वाघजाळीत कर्जवसुलीसाठी आलेल्या फायनांन्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला हुसकावले:क्रांतीकारी शेतकरी संघटना आक्रमक, यापुढे गुन्हे दाखल करण्याचा कावरखे यांचा इशारा