![]()
वारजे परिसरातील डुक्करखिंडीत अठरा वर्षांपूर्वी लुटमारीच्या उद्देशाने कंत्राटदाराचा चाकूने निर्घृण खून करून त्याच्या भाचीला गंभीर जखमी केल्याप्रकरणी दोघा तरुणांना न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. गुन्ह्याचे स्वरूप, त्याचा पीडित व त्यांच्या कुटुंबीयांवर झालेला आघात आणि समाजावर होणारा परिणाम लक्षात घेत अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांनी हा निकाल दिला. रझ्झाक रमजान शेख (वय ३७, रा. रामनगर, वारजे माळवाडी) आणि संतोष नागनाथ वाघमारे (वय ३४, रा. वारजे गाव) अशी दोषींची नावे आहेत. त्यांनी चाकूने केलेल्या हल्ल्यात कंत्राटदार रमेश नारायण चव्हाण यांचा मृत्यू झाला होता आणि त्यांची भाची इंदू पवार गंभीर जखमी झाली होती. ही घटना १५ फेब्रुवारी २००८ रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास वारजे माळवाडीतील डुक्करखिंड परिसरात घडली होती. रमेश चव्हाण आणि इंदू पवार हे दुचाकीवरून चांदणी चौकातून उत्तमनगरकडे चालले होते. डुक्करखिंडीत लघुशंकेसाठी थांबलेल्या चव्हाण यांना आरोपी व त्यांच्या विधीसंघर्षित साथीदारांनी चाकूचा धाक दाखवून दागिने आणि मोबाइल असा ५१ हजार रुपयांचा ऐवज लुटला. त्यानंतर आरोपींनी दोघांवर चाकूने वार केले. या हल्ल्यात जखमी चव्हाण यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. वारजे माळवाडी पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने दोघा आरोपींना अटक करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. अतिरिक्त सरकारी वकील संतोषकुमार पताळे यांनी या खटल्यात अठरा साक्षीदार तपासले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी इंदू पवारची साक्ष, रमेश चव्हाण यांनी उपचार घेताना नोंदविलेला जबाब, वैद्यकीय पुरावे आणि न्यायवैद्यक अहवाल आदी पुरावे महत्त्वपूर्ण ठरले. त्या आधारे सरकार पक्षाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने शिक्षा सुनावली. हेही वाचा.. दिवेआगर दुर्घटनेवर विजय वडेट्टीवार आक्रमक:म्हणाले- 8 विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? सरकार लोकांच्या जीवाशी खेळतंय; कुटुंबांना तातडीने मदतीची मागणी कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी (1 ऑक्टोबर) अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना घडली. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून सहलीसाठी आलेल्या 8 विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेवरून राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. किनाऱ्यांवर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यानेच निष्पाप मुलांचा बळी गेल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. सविस्तर वाचा
Source link
वारजेतील 18 वर्षांपूर्वीच्या कंत्राटदार हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप:लुटमारीसाठी खून, भाचीही झाली होती जखमी