![]()
शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील विधीमंडळाची अंदाज समिती मंगळवारी अमरावतीत दाखल झाली. २९ सदस्यीय समितीपैकी ८ सदस्य उपस्थित होते. समितीने विविध विभागांचा आढावा घेतला असून, बुधवारपासून जिल्हाभरात प्रत्यक्ष पाहणी दौरा करणार आहे. समितीने मंगळवारी सकाळी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यात तीन दिवसांच्या कामकाजावर शिक्कामोर्तब करण्यात आले. समितीचे सचिव विलास आठवले, सहसचिव राजेश तारवी, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्यासह इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सकाळच्या सत्रात समितीने महावितरण, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त आणि क्रीडा विभागाचा आढावा घेतला. दुपारनंतर जिल्हा परिषद व महापालिकेच्या कामकाजाचा तसेच त्यांनी केलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्यासह काशिराम पावरा, मनीषा चौधरी, कैलास पाटील, शेखर निकम, किशोर पाटील (विधानसभा सदस्य) आणि हेमंत पाटील, सतीश चव्हाण (विधानपरिषद सदस्य) अमरावतीत दाखल झाले होते. नाना पटोले आणि सुधीर मुनगंटीवार हे विदर्भातील सदस्यही लवकरच पोहोचतील अशी माहिती आहे. समितीचे प्रमुख आमदार अर्जुन खोतकर यांनी सांगितले की, विधीमंडळाच्या अंदाज समितीच्या कामकाजाची गोपनीयता राखली जाते. समितीने केलेल्या कामकाजाचा अहवाल विधीमंडळाला सादर केला जातो, त्यामुळे कोणत्याही विभागाच्या यशापयशाबद्दल सार्वजनिकरित्या बोलणे योग्य नाही.
Source link
विधीमंडळ अंदाज समिती अमरावतीत दाखल:8 सदस्य हजर., विविध विभागांचा आढावा घेतला; दोन दिवस जिल्हाभरात करणार पाहणी