![]()
जुन्या वादाचा राग मनात धरून वैजापूरमध्ये रोहित पठारे या तरुणाची तलवार, कुऱ्हाड आणि लोखंडी रॉडने वार करत निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर वैजापूर शहरातील वातावरण चांगलेच तापले असून, आरोपींना कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी मृत तरुणाच्या नातेवाईकांसह भीमसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. यावेळी एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली. दुसरीकडे, अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असताना संतप्त जमावाने त्यांच्यावर धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे न्यायालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणामुळे वैजापूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोहितच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी पोलिसांच्या सुरुवातीच्या भूमिकेवर गंभीर आक्षेप घेतले आहेत. तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली, तसेच आरोपींना पाठीशी घातल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या आरोपांची गंभीर दखल घेत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. तसेच पोलिसांच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त करत प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे निर्देश दिले. येवला रोडवर जुन्या वादातून दोन गटांमध्ये संघर्ष वैजापूर शहरातील येवला रोड परिसरात 31 ऑक्टोबर रोजी दोन तरुणांच्या गटांमध्ये जुन्या वादातून वादाची ठिणगी पडली. सुरुवातीला झालेल्या वादाचे रूपांतर काही वेळातच हिंसक संघर्षात झाले. यावेळी एका गटातील तरुणांनी तलवारी, कुऱ्हाडी आणि लोखंडी रॉड यांसारख्या घातक शस्त्रांचा वापर केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात रोहित पठारे गंभीर जखमी झाला. हल्ल्याची तीव्रता लक्षात घेता रोहितला तातडीने उपचारासाठी शिर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाही त्याची प्रकृती सुधारली नाही. अखेर 3 नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान रोहितचा मृत्यू झाला. तरुण मुलाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने पठारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेची माहिती वैजापूर शहरात पसरताच नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली. पोलिसांच्या भूमिकेवर कुटुंबीयांचे गंभीर आरोप रोहितच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. घटनेनंतर सुरुवातीच्या काळात पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. तसेच संबंधित आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे केवळ आरोपींना अटक करून चालणार नाही, तर या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाची तुलना संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी करत कुटुंबीयांनी तपासाबाबत संशय व्यक्त केला. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी आणि या प्रकरणातील सर्व संबंधितांना अटक करावी, अशी त्यांची मागणी आहे. पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन; आत्मदहनाच्या प्रयत्नाने खळबळ रोहितच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी वैजापूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. आरोपींना तातडीने अटक करण्याबरोबरच पोलिसांनी सुरुवातीला केलेल्या कथित हलगर्जीपणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान एका आंदोलकाने पोलीस ठाण्याच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. यानंतर संतप्त नातेवाईक आणि भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. तब्बल चार तास हे आंदोलन सुरू होते. यामुळे परिसरातील वाहतुकीवरही परिणाम झाला. आंदोलकांनी आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. त्यांच्या घोषणांमुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. पालकमंत्री संजय शिरसाट यांची पीडित कुटुंबीयांची भेट घटनेचे गांभीर्य आणि वाढता जनक्षोभ लक्षात घेऊन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रोहित पठारेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. रोहितच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे, तसेच पोलिसांच्या सुरुवातीच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांनंतर पालकमंत्री शिरसाट यांनी पोलीस प्रशासनाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. तसेच प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे निर्देश दिले. याशिवाय सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून पीडित कुटुंबाला पाच लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली. तीन आरोपी अटकेत; उर्वरित आरोपींचा शोध सुरू या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. मात्र, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे. सर्व आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीय आणि आंदोलकांकडून केली जात आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी नेले जात असताना न्यायालय परिसरात मोठा गोंधळ झाला. आरोपींना पाहताच तेथे उपस्थित असलेल्या संतप्त भीमसैनिकांनी त्यांच्यावर धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ धावपळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. वैजापूरमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला रोहित पठारेच्या हत्येनंतर शहरात निर्माण झालेला तणाव पाहता पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. संवेदनशील भागांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. एका बाजूला कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याची मागणी जोर धरत असताना दुसरीकडे उर्वरित आरोपींना अटक करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. रोहितच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींना अटक होणार का, पोलिसांच्या सुरुवातीच्या भूमिकेबाबत करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी होणार का आणि या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे आता वैजापूरसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. गरज नसेल तर सरकारचे 5 हजार रुपये परत करा:मंत्री गिरीश महाजनांचे आवाहन, जळगावमधील विधानाने चर्चांना उधाण राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी सरकारने त्यांच्या बँक खात्यांमध्ये 5 हजार रुपयांची अग्रीम रक्कम जमा केली आहे. मात्र, या मदतीवरून आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना या आर्थिक मदतीची आवश्यकता नाही, त्यांनी सरकारकडून मिळालेले 5 हजार रुपये परत करावेत, असे आवाहन भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाची सध्या चर्चा होत आहे. सविस्तर वाचा….
Source link
वैजापूरमध्ये जुन्या वादातून रोहित पठारेची निर्घृण हत्या:कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न, आरोपींना कोर्टात नेताना संतप्त जमावाचा गोंधळ