Headlines

वैजापूर हत्याकांडातील पीडित कुटुंबीयांना सामाजिक न्याय विभागातून 5 लाखांची मदत:आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवू; पालकमंत्री संजय शिरसाट यांचा थेट इशारा




संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या वैजापूर येथील रोहित अनिल पठारे (वय 24) हत्याकांड प्रकरणी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज पीडित पठारे कुटुंबीयांची वैजापूर येथे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी खासदार संदिपान भुमरे पाटील आणि वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे हे देखील उपस्थित होते. कुटुंबीयांचा आक्रोश आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवरील गंभीर आरोप ऐकल्यानंतर, पालकमंत्री शिरसाट यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पीडित कुटुंबाला 5 लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत जाहीर केली. तसेच स्थानिक पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणाचा तपास तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे आदेश दिले असून, “या क्रूर हत्याकांडातील एकाही आरोपीला सोडले जाणार नाही, त्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवू,” अशी ग्वाही शिरसाट यांनी दिली आहे. कुटुंबीयांचा आक्रोश आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह पालकमंत्री संजय शिरसाट घरी पोहोचताच मयत रोहित पठारे याचे आई-वडील आणि नातेवाईक अत्यंत भावनिक झाले आणि त्यांनी आरोपींना फाशी देण्याची मागणी लावून धरली. सुरुवातीच्या काळात पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली आणि आरोपींना पाठीशी घालून मदत केली, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी पालकमंत्र्यांसमोर केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तपास वर्ग कुटुंबीयांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत संजय शिरसाट यांनी स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवला. या प्रकरणात आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित फरार आरोपींच्या शोधासाठी 5 विशेष पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. सोशल मीडियावरून श्रद्धांजली भेटीनंतर शिरसाट यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, “रोहित अनिल पठारे यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. या दुःखाच्या प्रसंगी आम्ही पठारे कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.” वैजापूरच्या घटनेची क्रूर पार्श्वभूमी नेमकी काय? बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आठवण करून देणाऱ्या या अमानुष घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. गणपती विसर्जन मिरवणुकीतील जुन्या वादातून शनिवारी वैजापूर शहरातील येवला रोडवरील एका हॉटेलसमोर दोन गटांत सशस्त्र हाणामारी झाली होती. संशयितांनी रोहितला त्याच्या घरातून पळवून नेत चौकाचौकात फिरवून बेदम मारहाण केली. अमानुष छळाचा कळस आरोपींनी दगडाने रोहितचे पाय ठेचले आणि त्याच्या शरीरात स्क्रू-ड्रायव्हर खुपसले. रक्तबंबाळ अवस्थेत तो तहानेने व्याकूळ होऊन पाणी मागत असताना, नराधमांनी पाणी देण्याऐवजी त्याच्या तोंडावर लघवी केल्याचा अत्यंत संतापजनक आरोप नातेवाइकांनी केला आहे. मंगळवारी रात्री उपचारादरम्यान रोहितची प्राणज्योत मालवली. आत्मदहनाचा प्रयत्न आणि रास्ता रोको रोहितच्या मृत्यूनंतर 26 पैकी 25 आरोपी मोकाट असल्याने संतापलेल्या नातेवाइकांनी मंगळवारी मध्यरात्री वैजापूर पोलीस ठाण्याला घेराव घातला. तर बुधवारी सकाळी रोहितच्या एका मित्राने अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यानंतर जमावाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात 1.5 तास रास्ता रोको करत संभाजीनगर-नाशिक महामार्ग रोखून धरला होता. अखेर पोलिसांनी या प्रकरणात हत्या, अपहरण आणि ॲट्रॉसिटी (Atrocity) कायद्यान्वये गुन्हे दाखल केले असून, स्थानिक गुन्हे शाखेची 3 आणि वैजापूर पोलिसांची 2 अशी 5 पथके आरोपींचा शोध घेत आहेत. धाराशिवच्या कळंबमध्येही सिनेस्टाईल अपहरणाचा थरार राज्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत असतानाच धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील बोर्डा गावात एकतर्फी प्रेमातून धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणाने आपल्या 4 साथीदारांसह तरुणीच्या घरात घुसून तिच्या आईला आणि बहिणीला तलवारीचा धाक दाखवला आणि तरुणीला बळजबरीने उचलून एर्टिगा गाडीत घालून सुसाट पळ काढला. पळून जाताना रस्त्यात येणाऱ्यांना उडवल्याने झालेल्या अपघातात 2 नागरिक गंभीर जखमी झाले. कोयता लावून 30 मिनिटे पोलिसांना वेठीस धरले कळंब पोलिसांनी पाठलाग करत अंबाजोगाई येथे ही गाडी अडवली असता, मुख्य आरोपीने तरुणीच्या गळ्यावर कोयता ठेवून “एक तर तिला तरी संपवतो किंवा मी तरी संपवतो” अशी धमकी देत तब्बल 30 मिनिटे पोलिसांना वेठीस धरले. या थरारक नाट्यादरम्यान पोलिस कर्मचारी हनुमंत गायकवाड यांनी आपल्या जीवाची बाजी लावून आरोपीवर झडप घातली. या झटापटीत आरोपीच्या कोयत्याचा वार लागल्याने हनुमंत गायकवाड गंभीर जखमी झाले; मात्र त्यांच्या धाडसामुळे तरुणीचे प्राण वाचले आणि मुख्य आरोपीला बेड्या ठोकण्यात यश आले. या प्रकरणातील इतर 3 फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. —————————————————————————– हेही वाचा… वैजापुरात गँगवाॅर; तरुणाचा मृत्यू, नातलगांचा ठाण्यात ठिय्या: 25 आरोपींच्या अटकेसाठी नातलग आक्रमक, दीड तास रास्ता रोको गणपती विसर्जन मिरवणुकीतील जुन्या वादातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरात येवला रोडवरील एका हॉटेलसमोर शनिवारी दोन गटांमध्ये सशस्त्र हाणामारी झाली होती. यात गंभीर जखमी झालेला रोहित अनिल पठारे (२४) याचा मंगळवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाला चार दिवस उलटूनही २६ पैकी केवळ एकच संशयित पोलिसांच्या हाती लागला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *