![]()
माहे मे २०२६ मध्ये झालेला अवकाळी पाऊस, वादळी वारे, भीषण गारपिटीमुळे अचलपूर तालुक्यातील संत्रा, केळीसह इतर बहुवार्षिक फळबागांचे प्रचंड नुकसान झाले होते. शासनाने या नुकसानभरपाईची मदत घोषित केली. मात्र, प्रत्यक्ष लाभाच्या वेळी प्रशासकीय ‘ई-केवायसी’ची तांत्रिक यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्याचे समोर आले आहे. परिणामी, हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्या गेलेल्या तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यात मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. शेतकरी महा-ई-सेवा व सेतू केंद्रांचे उंबरठे झिजवून वैतागले आहेत. मे २०२६ च्या गारपिटीत तालुक्यातील तब्बल २० हून अधिक गावांना मोठा फटका बसला होता. या आपत्तीनंतर शासनाने अचलपूर तालुक्यातील फळपीक शेतकरी, बहुवार्षिक फळबागायतदार, असे एकूण ३७ हजार १८० शेतकरी मदतीसाठी पात्र ठरवले. परंतु, ही शासकीय मदत खात्यात जमा होण्यासाठी अनिवार्य असलेली आधार ई-केवायसी प्रक्रिया सध्या मोठी डोकेदुखी ठरत आहे. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या जातात. मात्र, प्रत्यक्ष लाभ मिळण्याच्या वेळी शेतकरी वंचितच राहत असल्याचे चित्र आहे. २०१४ प्रमाणेच २०२४-२५ आणि २०२५-२६ या वर्षांतील अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीची नुकसानभरपाई अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. विशेष म्हणजे, शासनाने २०२५ मध्ये बियाणे प्रत्यक्ष ई-केवायसी करण्यासाठी केंद्रावर जाणाऱ्या शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रणालीमध्ये ओटीपी येत नाही. दुसरीकडे, अंगठ्याचे ठसे लावूनही आधार लिंक व ई-केवायसी यशस्वी होत नसल्याचे चित्र आहे. रोजची शेतातली कामे, मजुरी, सोडून शेतकरी तासन् तास महा-ई-सेवा व सेतू केंद्रांवर रांगेत उभे राहत आहेत. मात्र, दिवसभर थांबूनही काम होत नसल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. एकीकडे सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. दुसरीकडे, शासनाच्या या गलथान तांत्रिक कारभारामुळे शेतकरी मानसिक व आर्थिक संकटात सापडले आहेत. वरिष्ठांना समस्येबाबत माहिती दिली ^”ई-केवायसी करताना तांत्रिक अडचणी येत असल्याबाबत काही शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. महा-ई-सेवा प्रणालीतील सर्व्हर व तांत्रिक त्रुटींबाबत वरिष्ठांना तत्काळ कळवण्यात आले आहे. ही समस्या लवकरात लवकर सोडवून शेतकऱ्यांना सुरळीत सेवा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. – सुदर्शन शहारे, तहसीलदार, अचलपूर.
Source link
शासनाकडून मदत घोषित, पण ई-केवायसी यंत्रणा कोलमडली:अचलपूर तालुक्यातील 37 हजार शेतकरी हवालदिल