![]()
छत्रपती शाहू महाराजांचे कार्य हे संविधानातील समतेकडे जाणारे महत्त्वाचे पाऊल ठरले, असे मत माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांनी आयोजित केलेल्या ३२ व्या गांधी दर्शन शिबिरात ते बोलत होते. गांधी भवन, कोथरूड येथे रविवारी झालेल्या या शिबिरात देशमुख ‘राजश्री शाहू महाराज आणि भारतीय संविधान’ या विषयावर मार्गदर्शन करत होते. शाहू महाराजांचे जीवन कार्य धर्मनिरपेक्ष व समाज परिवर्तन घडविणारे होते. त्यांनी स्त्री सक्षमीकरणाची क्रांती केली, महिलांना कायद्याचे पाठबळ दिले आणि वंचितांना आरक्षण दिले, असे देशमुख यांनी नमूद केले. या शिबिरात विविध विषयांवर चर्चासत्रे झाली. सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार समीर गायकवाड यांनी ‘सामाजिक विषमतेच्या तळाशी’ या विषयावर व्याख्यान दिले. पत्रकार मुक्ता कदम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘थॉटस् ऑफ पाकिस्तान’ या पुस्तकाविषयी विवेचन केले. तसेच, कुमार आहेर यांनी ‘मी सत्यशोधक ज्योतीराव फुले बोलतोय’ हा एकपात्री प्रयोग सादर केला. लक्ष्मीकांत देशमुख पुढे म्हणाले की, महात्मा फुलेंच्या प्रेरणेने शाहू महाराजांनी कार्य केले. ते एक आदर्श प्रशासक होते. शाहू महाराजांचा कालखंड महिला शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. त्यांनी स्वराज्यात सामाजिक न्याय देणारे संविधान निर्माण केले आणि समतेचा, सुधारणेचा मार्ग दाखवला. महाराजांनी आदेश काढून मागास व सवर्ण यांच्यासाठी एकत्र शाळा सुरू केल्या. त्यांनी अस्पृश्यांना वकिली शिक्षण दिले आणि सर्व सार्वजनिक जागा सर्वांसाठी खुल्या केल्या. कृतीने त्यांनी मनुस्मृतीचे कायदे झिडकारले. वेश्या आणि देवदासींच्या जीवनातील अनुभवांबद्दल बोलताना समीर गायकवाड यांनी सामाजिक दुहेरी मापदंडावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, वेश्येला ‘रंडी’ म्हटले जाते, परंतु तिच्याकडे जाणाऱ्या पुरुषाला किंवा तिला या व्यवसायात ढकलणाऱ्यांना दोष दिला जात नाही. समाजात स्त्री सन्मान केवळ नावालाच उरला आहे. अनेक वेश्यांना त्यांच्या इच्छा दाबून जगावे लागते. मामाने विकलेली किंवा सावत्र बापाने विकलेली स्त्री नाइलाजाने स्वतःला विकते, पण तिला प्रेमाचा स्पर्श मिळत नाही, असे निरीक्षण गायकवाड यांनी नोंदवले.
Source link
शाहू महाराजांचे कार्य संविधानातील समतेकडे जाणारे पाऊल- लक्ष्मीकांत देशमुख:गांधी दर्शन शिबिरात माजी सनदी अधिकाऱ्यांचे प्रतिपादन