![]()
अकोला जिल्ह्यातील शिवापूर येथील सुपुत्र आणि भारतीय लष्करात (६१ आर्म्ड युनिट / ६१ कॅव्हलरी) हॉर्स रायडिंग ट्रेनर म्हणून कार्यरत विठ्ठल सुरेशराव सारसे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शाही बग्गीचे सारथ्य करण्याचा ऐतिहासिक बहुमान मिळवला आहे.
.
केरळातील ‘इंडियन नेव्हल अकॅडमी’च्या (आयएनए) परेड ग्राउंडवर शनिवारी (दि. २८) ४०० नौदल अधिकाऱ्यांची दिमाखदार पासिंग आऊट परेड पार पडली. या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या राष्ट्रपतींच्या बग्गीचे सारथी होण्याचा मान त्यांना मिळाला. २१ वर्षांच्या सेवाकाळातील हा सर्वात अविस्मरणीय क्षण असल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
भारतीय लष्करातील विठ्ठल सारसे यांच्यासह १० प्रशिक्षकांची चमू केरळमधील ‘इंडियन नेव्हल अकॅडमी’मध्ये तीन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहे.
येथे चार वर्षांच्या प्रशिक्षण कालावधीत असलेल्या नौदलाच्या ३५० हून अधिक कॅडेट्सना दररोज ४० मिनिटांच्या बॅचमध्ये घोडेस्वारीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. विठ्ठल सारसे हे शिवापूर येथील ‘जय भवानी व्यायाम शाळे’चे माजी विद्यार्थी आहेत. १८ व्या वर्षी (सन २००६ मध्ये) ते भारतीय लष्करात दाखल झाले. त्यांनी आतापर्यंत जयपूर व दिल्ली येथे २१ वर्षे देशसेवा केली. दिल्लीतील १० ते १५ प्रजासत्ताक दिन परेडमध्ये सहभाग व नेतृत्व केले आहे. यापूर्वी नौदल प्रमुखांच्या बग्गीचे सारथ्य केल्याचा अनुभव व घोडेस्वारीतील त्यांचे प्राविण्य विचारात घेऊन, आयएनए अकॅडमीत राष्ट्रपतींच्या बग्गीचे सारथ्य करण्यासाठी निवड झाली. राष्ट्रपतींच्या बग्गीच्या संचालनासाठी गेल्या एका महिन्यापासून दररोज सकाळी कडक सराव केला जात होता. या शाही ताफ्यामध्ये बग्गीच्या पुढे दोन आणि मागे दोन असे चार अंगरक्षक घोड्यांवर स्वार होऊन चालत होते. प्रत्यक्ष सोहळ्यादरम्यान सुमारे ३ मिनिटांच्या वेळेत विठ्ठल सारसे यांनी अत्यंत कौशल्याने राष्ट्रपतींच्या बग्गीचे सारथ्य करून त्यांना नियोजित ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचवले.
महिनाभर सराव, ३ मिनिटांचे सारथ्य
माझ्यासाठी हा अभिमानाचा क्षण ^ सेवाकाळात राष्ट्रपतींच्या बग्गीचे सारथ्य करण्याची संधी मिळेल असे वाटले नव्हते. हा माझ्या २१ वर्षांच्या लष्करी कारकीर्दीतील सर्वात आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे. जय भवानी व्यायाम शाळेचे अनेक विद्यार्थी देशसेवा करत आहेत. -विठ्ठल सारसे, जवान.