Headlines

श्रीवर्धन बीचला आंतरराष्ट्रीय ‘ब्लू फ्लॅग’ पुरस्कार:स्वच्छता, पर्यावरण संवर्धन अन् सुरक्षिततेचे आंतरराष्ट्रीय निकष केले पूर्ण- मंत्री आदिती तटकरे




रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘ब्लू फ्लॅग’ पुरस्कार मंजूर झाला असून, हा बहुमान मिळवणारा श्रीवर्धन बीच रायगड जिल्ह्यातील पहिला मानांकित समुद्रकिनारा ठरल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. ‘ब्लू फ्लॅग’ या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी सातत्याने प्रयत्न आणि पाठपुरावा करणाऱ्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, “गेल्या दोन वर्षांपासून आम्ही ज्या स्वप्नाचा सातत्याने पाठपुरावा करत होतो, त्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. श्रीवर्धन बीच हा रायगड जिल्ह्यातील पहिला ‘ब्लू फ्लॅग’ प्राप्त समुद्रकिनारा ठरला आहे, याचा मला विशेष आनंद आणि अभिमान आहे. या कालावधीत यासंदर्भात अनेक बैठका घेण्यात आल्या तसेच समुद्रकिनाऱ्याचा पर्यावरण आणि स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. हा पुरस्कार म्हणजे केवळ एक ध्वज नसून आपल्या समृद्ध आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय ओळख आहे. या यशासाठी सहकार्य करणारे सर्व अधिकारी, स्थानिक नागरिक आणि सहकाऱ्यांचे मी मनःपूर्वक आभार मानते,” असेही मंत्री तटकरे यांनी सांगितले. ब्लू फ्लॅग पुरस्काराविषयी – ‘ब्लू फ्लॅग’ हे आंतरराष्ट्रीय पर्यावरण विषयक मानांकन डेन्मार्कस्थित फाउंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन (FEE) मार्फत दिले जाते. समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता, पाण्याची गुणवत्ता, पर्यावरण व्यवस्थापन, जैवविविधतेचे संरक्षण, पर्यावरणविषयक जनजागृती, पर्यटकांची सुरक्षितता आणि आवश्यक सुविधांची उपलब्धता अशा विविध निकषांची पूर्तता करणाऱ्या समुद्रकिनाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. या मानांकनासाठी समुद्रकिनाऱ्याच्या पाण्याची नियमित तपासणी, कचरा व्यवस्थापन, स्वच्छतागृहांची उपलब्धता, प्रथमोपचार व आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था, पर्यावरणविषयक माहिती तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी लागू असलेल्या सुलभता निकषांची पूर्तता अशा बाबींचे मूल्यमापन केले जाते. त्यामुळे ‘ब्लू फ्लॅग’ पुरस्कार हा केवळ समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्याचा गौरव नसून, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, सुरक्षितता आणि शाश्वत पर्यटनाच्या दृष्टीने त्या समुद्रकिनाऱ्याने पूर्ण केलेल्या आंतरराष्ट्रीय निकषांची मान्यता आहे. श्रीवर्धन बीचला मिळालेला हा बहुमान रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीच्या आंतरराष्ट्रीय ओळखीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही आदिती तटकरे यांनी सांगितले. श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचा प्रत्यक्ष ‘ब्लू फ्लॅग’ लवकरच सुपूर्द करण्यात येणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *