![]()
छत्रपती संभाजीनगर शहरात लघु उद्योजकांसाठी आयोजित ५ व्या आंतरराष्ट्रीय रिव्हर्स बायर-सेलर मीटमध्ये ३० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे २० व्यावसायिक करार झाले. यामुळे शहरासह राज्यातील अभियांत्रिकी क्षेत्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना निर्यातीसाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली झाली आहेत. केंद्र शासनाच्या रॅम्प योजनेंतर्गत महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ आणि ईईपीसी इंडियातर्फे १६ व १७ जून रोजी या मीटचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यात अमेरिका, फ्रान्स, यूएई, ब्राझील, ओमानसह १४ देशांतील २७ आंतरराष्ट्रीय खरेदीदार आणि राज्यातील २२० पेक्षा अधिक उद्योजकांनी आपला सहभाग नोंदवला. या दोन दिवसांत ७०० हून अधिक बी-टू-बी व्यावसायिक बैठका पार पडल्या. यातून केनिया, यूएई, युगांडा, ब्राझील, ओमान, झिम्बाब्वेसह अनेक देशांतील विदेशी कंपन्यांनी स्थानिक उद्योजकांसोबत महत्त्वपूर्ण व्यावसायिक करार केले आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास पानसरे यांच्या हस्ते झाले. या उपक्रमामुळे स्थानिक उद्योजकांना जागतिक स्तरावर हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. स्थानिक उद्योजकांना ग्लोबल मार्ग या मीटमुळे स्थानिक उद्योजकांना केवळ तत्काळ ३० कोटींच्या ऑर्डरच मिळाल्या नाहीत, तर परदेशी खरेदीदारांच्या तांत्रिक अपेक्षा आणि गुणवत्तेचे निकष समजले. तसेच निर्यात प्रक्रिया, बँक व्यवहार आणि जागतिक मानकांचे एकाच छताखाली मार्गदर्शन मिळाले.
Source link
संभाजीनगरात लघुउद्योजकांचे 30 कोटी रुपयांचे 20 करार:राज्यातील 220 उद्योजक, 27 आंतरराष्ट्रीय खरेदीदारांनी घेतला सहभाग