![]()
संशोधन ही केवळ पदवी मिळविण्याची प्रक्रिया नसून नव्या ज्ञानाची निर्मिती करून सामाजिक समस्यांवर नावीन्यपूर्ण उपाय शोधण्याचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी चिकित्सक दृष्टिकोनातून प्रश्नांचा अभ्यास करून संशोधनाला सामाजिक उपयुक्ततेची जोड द्यावी, असे आवाहन सहाय्यक प्राध्यापक डॉ. राहुल पालके यांनी केले. जामगाव (ता. बार्शी) येथील एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्चमध्ये विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘आविष्कार-२०२६’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पालके बोलत होते. त्यांनी संशोधनाचे महत्त्व, संशोधनातील नीतीमूल्ये आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासातील संशोधनाची भूमिका स्पष्ट केली. संशोधन करताना प्रामाणिकपणा , वस्तुनिष्ठता, संदर्भांचा योग्य वापर आणि साहित्यचौर्य टाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमात मानव्यशास्त्र, विज्ञान, विधी आणि अभियांत्रिकी या शाखांतील विद्यार्थ्यांनी विविध संशोधन प्रकल्प सादर केले. प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पना मांडत त्यांची व्यावहारिक उपयुक्तता अधोरेखित केली. प्रत्येक शाखेतून तीन विद्यार्थ्यांची विद्यापीठीय आविष्कार कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली. प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे यांनी ‘आविष्कार’ उपक्रमाचे महत्त्व विशद केले. पाठ्यपुस्तकांतील ज्ञानाच्या पलीकडे जाऊन स्वतंत्र विचार करणे, संशोधन प्रश्न निश्चित करणे आणि स्वतःच्या संकल्पना प्रकल्पांच्या माध्यमातून मांडणे यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. संशोधन प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये उपक्रमशीलता, संघभावना, चिकित्सक विचार आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित होते, असेही त्यांनी सांगितले. विद्यापीठीय आविष्कारसाठी झाली निवड ‘आविष्कार-२०२६’मध्ये मानव्यशास्त्र, विज्ञान, विधी आणि अभियांत्रिकी शाखांतील विद्यार्थ्यांनी संशोधन प्रकल्प सादर केले. प्रत्येक शाखेतून तीन विद्यार्थ्यांची विद्यापीठीय आविष्कार कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली. या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या कल्पना मांडण्याची, संशोधनातील कौशल्ये विकसित करण्याची आणि आपल्या प्रकल्पांची उपयुक्तता अधोरेखित करण्याची संधी मिळाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील स्तरावर संशोधन सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे
Source link
संशोधनातून सामाजिक समस्यांवर नावीन्यपूर्ण उपाय शोधा:‘आविष्कार-2026’मध्ये डॉ.पालके यांचे विद्यार्थ्यांना आवाहन