![]()
निफाड तालुक्यातील देवगाव या छोट्याशा गावातून सुरू झालेला सर्वेश कुशारे यांचा प्रवास भारतीय क्रीडा इतिहासातील प्रेरणादायी पर्व ठरला आहे. सर्वेश यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये रौप्यपदक पटकावत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सर्वेश यांच्या वडिलांचा कांदाशेती हा उदरनिर्वाहाचा मुख्य आधार होता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आधुनिक प्रशिक्षणाची साधने उपलब्ध नव्हती. मात्र, स्वप्न मोठे आणि जिद्द त्याहूनही मोठी होती. लहानपणी मक्याच्या चाऱ्यापासून व बारदानामध्ये भरून तयार केलेल्या तात्पुरत्या गादीवर त्यांनी उंच उडीचा सराव केला. साधनांची कमतरता त्यांच्या ध्येयाच्या आड कधीच आली नाही. त्यांच्या या प्रवासात प्रशिक्षक रावसाहेब जाधव यांचे मार्गदर्शन निर्णायक ठरले. योग्य तंत्र, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वासाच्या बळावर सर्वेश यांनी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत भारतीय अॅथलेटिक्समध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले. याच वर्षी मोनॅको डायमंड लीगमध्ये पदार्पणातच तिसरे स्थान पटकावत डायमंड लीगमध्ये पोडियमवर स्थान मिळवणारे ते पहिले भारतीय खेळाडू ठरले. त्यानंतर ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २.२५ मीटर उडी मारत त्यांनी ऐतिहासिक रौप्यपदक पटकावले. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारे ते पहिले भारतीय ठरले. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी आशियाई स्पर्धा आणि ऑलिम्पिकमध्येही ते भारतासाठी सुवर्णयश मिळवतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. सन २०१६ मध्ये भारतीय सैन्याच्या १०१ फील्ड रेजिमेंटमध्ये नायब सुभे दार म्हणून दाखल झाल्यानंतर त्यांना अत्याधुनिक प्रशिक्षणाची संधी मिळाली. त्यानंतर २०१९ दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक, २०२३ आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक, २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व, २०२५ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारे पहिले भारतीय पुरुष उंच उडीपटू आणि २०२६ मध्ये भुवनेश्वर येथे २.३१ मीटर उडी मारत राष्ट्रीय विक्रम केला आहे.
Source link
सर्वेश कुशारेला राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक:प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देवगावच्या खेळाडूने अभिमानाने फडकावला भारताचा तिरंगा