.

कळवण आणि बागलाण तालुक्यात यंदा सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे १६,७३० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून, दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला जलसिंचनाचा लाभ मिळणार आहे. ३७४ गावांचा पाणीप्रश्न सटला आहे.
पावसामुळे सुरगाण्यातील राहूड, शिंदे आणि घोडंबे ही धरणे भरली आहेत. कळवणमधील चणकापूर व पुनद या मोठ्या धरणांसह ओतूर, धार्डेदिगर, भेगू, गोबापूर, धनोली, मळेगाव, बोरदैवत, मार्कंड पिंपरी, खिराड, भांडणे व जामले वणी ही मध्यम स्वरूपाची धरणेही शंभर टक्के भरली आहेत. बागलाणमधील हरणबारी व केळझर ही धरणेही भरली असून, देवळा तालुक्यातील रामेश्वर व वार्शी धरणांनीही शंभर टक्के पातळी गाठली आहे. तर, मालेगाव येथील गिरणा धरण सध्या ६५ टक्के भरले आहे. चणकापूर धरण भरल्यानंतर उजव्या कालव्यातून १०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असून, गिरणा नदीपात्रात ७००० क्युसेक पूरपाणी सुरू आहे. पुनद धरणातून नदीपात्रात रोज ५७०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. ८० टक्के भरलेले चणकापूर धरण.
चणकापूर व पुनदचा ६० टक्के साठा मालेगावसाठी चणकापूर व पुनद या दोन्ही मोठ्या धरणातील ६० ते ७० टक्के पाणीसाठा मालेगाव तालुक्यासाठी आरक्षित करण्यात आलेला आहे. त्याशिवाय मालेगावसाठी मोसम नदीद्वारे पाणी मिळणारे हरणबारी धरण १०० टक्के भरल्यामुळे बागलाण व मालेगावचा पाणीप्रश्न सुटला आहे तर, कळवण तालुक्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो झाल्यामुळे कळवण व देवळा तालुक्याचाही पाणीप्रश्न सुटला आहे.
पाचही तालुक्यात यावर्षी २८७४ मिमी पावसाची नोंद झाली असून, यामध्ये सगळ्यात जास्त ७८४ मिमी पाऊस सुरगाणा तालुक्यात पडला आहे. तर त्याखालोखाल कळवण तालुक्यात ७०३, देवळा तालुक्यात ४८० तर बागलाण तालुक्यात ६५९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.