Headlines

सामाजिक उपक्रम:दानापूर येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वीकारली वृक्षसंगोपनाची जबाबदारी




दैनिक दिव्य मराठीच्या “एक वृक्ष, एक जीवन’ या पर्यावरणपूरक अभियानाला भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेने प्रतिसाद दिला आहे. शाळेतील दहा विद्यार्थ्यांनी स्वखर्चाने वृक्षरोपे आणून लागवड केली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः लावलेल्या वृक्षाच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे शाळा परिसर अधिक हिरवागार होण्यास मोठी मदत होणार आहे. ३० जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने वृक्षलागवड केली. वृक्षलागवडीनंतर रोपांचे संरक्षण व्हावे. रोपे व्यवस्थित वाढावीत. या उद्देशाने शाळेचे मुख्याध्यापक दीपक जाधव यांनी स्वतः पुढाकार घेऊन दहा संरक्षण जाळ्या उपलब्ध करून दिल्या. प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावाची पाटी संबंधित झाडाला लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वृक्षांविषयी मालकीची भावना निर्माण होईल. संगोपनाची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण होत आहे. वृक्षसंवर्धनाची सवय लहानपणापासून रुजविण्याचा प्रयत्न शाळेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या या पुढाकाराचे गावकऱ्यांकडून तसेच शिक्षण क्षेत्रातून कौतुक होत आहे. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख जफर, उपाध्यक्ष अंकुश दळवी, सदस्य अनिल दुतोडे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन करण्यात आले. संगोपनाची जबाबदारी : “एक वृक्ष, एक जीवन’ या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होत आहे. दानापूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी दहा वृक्ष लावून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली आहे. अशा उपक्रमांमुळे वृक्षलागवडीचे प्रमाण वाढण्यास निश्चितच हातभार लागण्यास मदत होईल, असे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख जफर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या नावाच्या पाट्या : दानापूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत “दिव्य मराठी’ च्या ” एक वृक्ष, एक जीवन’अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. वृक्षप्रेमी रमेश कनगरे यांच्या सहकार्याने दहा वृक्ष उपलब्ध झाले आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांची लागवड केली आहे. या झाडांच्या संरक्षणासाठी शाळेच्या वतीने जाळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या नावाच्या पाट्या झाडांवर लावून त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही निश्चित करण्यात येणार आहे, अशी माहिती दानापूर येथील जि. प. प्रशालेचे मुख्याध्यापक दीपक जाधव यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *