Headlines

सिल्लोड तहसील कार्यालयात महाराजस्व अभियानाचा समारोप:आमदार अब्दुल सत्तार यांची उपस्थिती, सहभागी शेतकऱ्यांना मार्गदर्शन‎




राज्य शासनाने राबविलेल्या महाराजस्व अभियान टप्पा – १ चा समारोप आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत सिल्लोड तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महसूल प्रशासन हे केवळ कागदपत्रांचे काम करणारे कार्यालय नसून जनतेच्या विश्वासाचे केंद्र आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता, पारदर्शकता आणि तत्परता या तीन तत्वांवर काम करावे. नागरिकांची उर्वरित प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावून सर्वसामान्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्या, अशा स्पष्ट सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी महसूल प्रशासनाला दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्याचा संकल्प आपण सर्वांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, गटविकास अधिकारी दादाराव अहिरे, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, जि.प. सदस्य देविदास पालोदकर, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, नगरसेवक सिद्धेश्वर आहेर, नायब तहसीलदार तुकाराम बनकर आदींसह लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक तहसीलदार अंकिता ताकभाते यांनी तर मंडळ अधिकारी काशिनाथ ताठे यांनी उपस्थितांचे आभार मानले. अभियानामध्ये ६८३७ प्रलंबित प्रकरणे मार्गी या अभियानामध्ये तब्बल ६८३७ प्रलंबित प्रकरणे मार्गी लावून पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. शासनाच्या योजना व सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अधिक गतिमान व लोकाभिमुख पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात काही पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *