![]()
‘काहीच कारण नसताना पत्नी मला सोडून गेली. या प्रकरणी तक्रार करूनही प्रशासनाने कारवाई केली नाही. १५ दिवस उपोषण केले तरी न्याय मिळाला नाही,’ अशी व्यथा सांगत एका तरुणाने चक्क जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका गाढविणीशी प्रतीकात्मक लग्न लावून आपला संताप व्यक्त केला. सायंकाळी सदर बझार पोलिसांनी त्याला तेथून ठाण्यात नेऊन बसवले.
दीपक सूर्यवंशी असे तरुणाचे नाव आहे. तो पूर्वी पुण्यात राहायचा. आता सोलापुरात राहतो. गेल्या १६ वर्षांपासून आमचा संसार सुरू होता. पण पत्नी अचानक माहेरी निघून गेली. ती परत यायला तयार नाही. त्यामुळे काही महिन्यांपासून दीपक हे तीव्र मानसिक तणावाखाली आहेत. आपल्या पत्नीचा शोध घेऊन तिला पुन्हा घरी आणून द्यावे, यासाठी दीपक यांनी पोलीस आणि शासनाकडे अनेकदा दाद मागितली. पण त्यांना न्याय मिळाला नाही. माझी पत्नी स्वत: घरातून गेली नसून मेहुण्यासह तिघांनी तिला फूस लावून आपल्यापासून दूर नेले आहे, मुलीलाही आपल्यापासून दूर नेले,’ असा त्यांचा आरोप आहे. अखेर त्यांनी पूनम गेटसमोर १५ दिवसांपासून उपोषण सुरू केले. पण तरीही प्रशासनातील एकाही अधिकाऱ्याने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे दीपक यांनी सोमवारी चक्क एक गाढवीण आणून तिच्याशी आपले प्रतीकात्मक लग्न लावले.
Source link
सोलापुरात पत्नी सोडून गेल्याने तरुणाने केले गाढविणीशी लग्न:मेहुण्यासह तिघांनी फूस लावून पत्नीला नेल्याचा केला आरोप