Headlines

हातामध्ये एसटीचे एनसीएमसी कार्ड; तरीही महिलांना पूर्ण तिकीटाचा भुर्दंड:पहिल्याच दिवशी तांत्रिक गोंधळाने योजना अडचणीत; प्रवाशांना मनस्ताप‎


.

राज्य परिवहन महामंडळाच्या सवलतींसाठी १ सप्टेंबरपासून एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. योजनेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक गोंधळामुळे सटाणा आगारात या योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसले. कार्ड हातात असूनही तिकीट मशीनवर सवलतीची प्रक्रिया होत नसल्याने अनेक महिलांना हाफ ऐवजी पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागला. काही महिलांना सवलत न मिळाल्याने बसमधून उतरावे लागले. त्यामुळे महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला, तर वाहकांनाही तिकीट देताना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले.

सटाणा बसस्थानकावर सवलतीच्या तिकीटासाठी महिलांची गर्दी झाली होती. अनेक महिलांकडे एनसीएमसी कार्ड होते; मात्र तिकीट मशीनमध्ये कार्डची नोंद किंवा प्रक्रिया व्यवस्थित होत नसल्याने सायंकाळी पाच वाजेपर्यंत हाफ तिकीट देता येत नव्हते. परिणामी, काही बसमधील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. काही महिलांना कार्ड असूनही फुल्ल तिकीट काढावे लागले. तर काहींच्या कार्डवर रिचार्ज नसल्याने त्यांनाही सवलतीचा लाभ घेता आला नाही. सवलतीचा लाभ मिळेल या अपेक्षेने कार्ड घेऊन आलेल्या महिलांना प्रत्यक्षात पूर्ण भाडे भरावे लागल्याने संताप व्यक्त होत होता. विद्यार्थ्यांनाही या गोंधळाचा फटका बसला. ज्येष्ठ नागरिकांही तांत्रिक अडचणींमुळे गैरसोयीला सामोरे जावे लागले. कार्डची प्रक्रिया होत नसल्याने वाहकांचीही प्रवाशांना समजावून सांगताना कसरत होत होती. पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणींमुळे सवलतीऐवजी पूर्ण तिकीट भरावे लागल्याने एसटी प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. योजना कागदावर सवलतीची असली, तरी प्रत्यक्षात तांत्रिक गोंधळामुळे प्रवाशांच्या खिशाला फटका बसल्याचे दिसून आले.

. कार्ड दाखवणे पुरेसे नाही; मशीनवर व्यवहार पूर्ण होणे आवश्यक. . प्रवासापूर्वी एनसीएमसी कार्डमध्ये आवश्यक शिल्लक रक्कम असणे आवश्यक. . बसमध्ये तिकीट घेताना एनसीएमसी कार्ड वाहकाच्या ईटीआयएम मशीनवर टॅप करावे. . कार्डवरील पात्रता प्रणालीत नोंदलेली असल्यास संबंधित सवलत लागू होऊन तिकीट व्यवहार केला जातो. . व्यवहार पूर्ण झाल्यानंतर वाहकाकडून तिकीट घ्यावे. . कार्डमध्ये शिल्लक नसल्यास किंवा तांत्रिक प्रक्रिया न झाल्यास सवलतीचा लाभ मिळण्यात अडचण येऊ शकते. . कार्ड असूनही सवलत लागू होत नसेल, तर वाहकाकडून व्यवहाराची नोंद व तांत्रिक अडचणीची माहिती घ्यावी.

^एनसीएमसी कार्ड योजनेचा मंगळवारी पहिलाच दिवस होता. त्यातच राज्यभरात तांत्रिक गोंधळामुळे कार्डद्वारे तिकीट देण्यात अडचणी येत होत्या. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली आहे. – हेमंत पगार, आगार व्यवस्थापक, सटाणा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *