Headlines

हिंदू संघटना मजबूत करून एकजूट वाढवण्यासाठी तरुणांनी पुढे यावे:विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांचे अशोकजी सिंघल जन्मशताब्दी कार्यक्रमात आवाहन




हिंदू संघटना अधिक मजबूत करणे आणि हिंदू बांधवांची एकजूट निर्माण करणे, हे श्रद्धेय अशोकजी सिंघल यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाजाने आणि विशेषतः तरुणांनी पुढाकार घेऊन एकत्र आले पाहिजे. हिंदू समाजातील स्वाभिमान जागृत करण्याचे आणि त्यांच्यामध्ये निर्भयता निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम अशोकजी सिंघल यांनी केले. त्यांनी राम मंदिराच्या आंदोलनाचा पाया रचला आणि त्यामुळेच आज अयोध्येत राम मंदिर उभे राहू शकले. त्यासाठी आपण त्यांचे आयुष्यभर ऋणी राहिले पाहिजे, असे मत विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी व्यक्त केले. विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने श्रद्धेय अशोकजी सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हिंदू समरसता संगम या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून आलोक कुमार बोलत होते. या कार्यक्रमाला अशोकजी सिंघल जन्मशताब्दी वर्ष उद्घाटन समारोह समितीचे अध्यक्ष गजानन धरणे, श्री श्री १००८ आचार्य श्री स्वामी जितेंद्रनाथजी महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, अ‍ॅड. एस. के. जैन, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सहमंत्री नितीन वाटकर, दिलीप कोटीभास्कर, धनाजी शिंदे, मातृशक्ती प्रमुख प्रिया रसाळ, दुर्गावाहिनी संयोजिका सोनाली नाथ, विभाग मंत्री संतोष अनगोलकर, दिनेश लाड, कार्यक्रम व्यवस्था सहप्रमुख करण घोडके व श्रीकांत चिल्लाळ उपस्थित होते. आलोक कुमार म्हणाले, अशोकजी सिंघल यांनी आपले संपूर्ण आयुष्य हिंदू धर्मासाठी समर्पित केले. राम मंदिर निर्मितीचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यांचे कार्य आणि विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. श्री श्री १००८ आचार्य श्री स्वामी जितेंद्रनाथजी महाराज म्हणाले, अशोकजी सिंघल यांचे विचार आणि कार्य इतके प्रेरणादायी आहे की, आजही त्यातून ऊर्जा आणि नवचेतना मिळते. हिंदू धर्मावरील संकट वेळीच ओळखून त्यांनी संपूर्ण जीवन राष्ट्रकार्यासाठी समर्पित केले. नानासाहेब जाधव म्हणाले, आजच्या जेन-झी तरुणांना भारतावर आणि विशेषतः हिंदू धर्मावर कोणत्या प्रकारचे संकट आले होते, त्यातून हिंदू बांधवांनी कशाप्रकारे मार्ग काढला आणि देश कोणत्या संकटातून गेला, याची माहिती नाही.त्यामुळे विश्व हिंदू परिषदेचे कार्य आणि अशोकजी सिंघल यांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचले पाहिजेत. पंच पारंपरिक वाद्यांचा विश्वविक्रम अशोकजी सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त पंच पारंपरिक वाद्यांचा विश्वविक्रम करण्यात आला. यामध्ये ५०० शंख, ३०० ढोल-ताशे, १०० टाळ, १०० पखवाज, ५० संबळ आणि एक बासरी अशा एकूण १,०५१ वाद्यांचा समावेश होता. या उपक्रमासाठी पद्मश्री शिवमणी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *