![]()
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्यांसाठी दाखल असताना, अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेली भेट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आलेला फोन यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. या सर्व चर्चांवर आमदार रोहित पवार यांनी यवतमाळ मधून सविस्तर खुलासा केला आहे. “पवार साहेब हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. तब्येत खालावल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना जास्त न बोलण्याचा आणि ताण न घेण्याचा सल्ला दिला आहे; म्हणूनच त्यांनी पटेलांना ‘तब्येत बरी होऊ द्या, मग तारखेनंतर बोलू’ असे म्हटले असेल. आजारी माणसाला दुसऱ्या पक्षातील कोणी भेटायला येत असेल तर त्यामागे राजकारण नसते. मात्र, भेटणाऱ्या लोकांनी त्या भेटीच्या फोटो आणि व्हिडिओचा वापर करून आपल्या पक्षांतर्गत राजकारणासाठी वेगळे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर ते अजिबात योग्य नाही,” असा सणसणीत टोला रोहित पवारांनी अजित पवार गटाला लगावला आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी यवतमाळ दौऱ्यावर आलेल्या रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ यांचा ईडी क्लोजर रिपोर्ट, गोकुळ दूध संघातील वाद, पोलीस भरती घोटाळ्यातील तरुणाचा मृत्यू आणि राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून सरकारला धारेवर धरले. फक्त पटेलांनी फोटोंचा वापर करू नये ब्रीच कँडी रुग्णालयातील भेटीगाठींवर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, “डॉक्टरांनी पवार साहेबांना जास्त बोलण्यास आणि लोकांना भेटण्यास मनाई केली आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल भेटायला आल्यावर साहेबांनी ‘माझी तब्येत जरा बरी होऊ द्या, मग काम असेल तर बोलू’ असे सांगितले असेल. या सामान्य संवादात दुसरे कोणतेही राजकारण नाही.” अदानी आणि मोदींच्या फोनवर स्पष्टीकरण “पंतप्रधान मोदी असोत किंवा उद्योगपती गौतम अदानी; पवार साहेबांची तब्येत बिघडल्यावर यापूर्वीही सर्वच नेते आणि उद्योजक विचारपूस करतात. आजारपणात विचारपूस करण्यात गैर काहीच नाही. पण रुग्णालयातील फोटोंचा वापर करून पक्षांतर्गत कुरघोड्या करणे चुकीचे आहे.” मुश्रीफांना क्लोजर रिपोर्ट खऱ्या तपासातून मिळाला की द्यायचा म्हणून दिला? मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने सादर केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयाने स्वीकारल्यावरून रोहित पवारांनी शंका उपस्थित केली. “ईडीच्या भीतीमुळेच मुश्रीफ साहेबांना शरद पवार साहेबांना सोडून जावे लागले होते. गेल्या ४ वर्षांपासून ते अजित दादांसोबत होते आणि आजही भाजपसोबत सत्तेत आहेत. त्यामुळे त्यांना दिलेला हा क्लोजर रिपोर्ट खरोखरच सखोल तपास करून दिला आहे की केवळ भाजपसोबत असल्यामुळे ‘द्यायचा म्हणून दिला आहे’, हे तपासावे लागेल.” कोल्हापुरात संविधान पायदळी अन् नागपुरात ‘संविधान बचाव’ रॅली गोकुळ दूध संघातील 4 शासननियुक्त संचालकांच्या निर्णयावर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील रॅलीवर रोहित पवारांनी सडकून टीका केली. “एकीकडे कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघात सतेज पाटील यांचे 13 संचालक निवडून आलेले असताना भाजपचे 12 संचालक असूनही सरकारने बेकायदेशीरपणे 4 संचालक लादून संविधानाचा खून केला. आणि दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात ‘संविधान बचाव’ रॅली काढतात! हा निव्वळ दिखावा आणि हास्यास्पद विरोधाभास आहे. येत्या 9 नोव्हेंबरला आम्ही सर्वजण कोल्हापूरच्या रस्त्यावर उतरून या हुकूमशाहीविरोधात मोठे आंदोलन करणार आहोत.” केंद्रातही भाजप, राज्यातही भाजप “केंद्रात आणि राज्यात भाजपचेच सरकार असताना हे म्हणतात ‘हिंदू खतरे में है’ आणि ‘संविधान खतरे में है’. जर एवढाच खतरा असेल, तर या सर्व भाजप नेत्यांना जनतेने घरी बसवले पाहिजे.” पोलीस भरती रॅकेट उघड करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू धाराशिव आणि बीड पोलीस भरतीतील बोगस प्रमाणपत्र रॅकेट उघड करणाऱ्या तरुणाच्या मृत्यूवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. “बोगस क्रीडा प्रमाणपत्र रॅकेट समोर आणणारा तरुण वैभव चव्हाण याचा संशयास्पद मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यात भ्रष्टाचार उघड करणाऱ्या तरुणांनाच संपवले जात असेल, तर कायदा आणि सुव्यवस्था तळागाळाला गेली आहे. आम्ही वैभवच्या कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभे असून त्याचा अर्धवट राहिलेला लढा पुढे नेऊ.” शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख, तर शेतमजुरांना 25,000 रुपयांची मदत द्या! यवतमाळमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर रोहित पवारांनी सरकारकडे महत्त्वाच्या मागण्या केल्या. “यंदा मी स्वतःच्या घरी दिवाळी साजरी न करता विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिकमधील शेतकरी व शेतमजुरांसोबत दिवाळी साजरी करत आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या रखडलेल्या शासकीय फाईल्स मार्गी लावण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत.” कर्जमाफी आणि वसुलीला दीड वर्ष स्थगिती द्या “दुष्काळामुळे बळीराजा आणि शेतमजूर उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १ लाख रुपये, शेतमजुरांना २५,००० रुपये थेट मदत द्यावी; तसेच बचत गट आणि मायक्रो फायनान्सचे कर्ज माफ करावे किंवा त्यांचे व्याज सरकारने भरून पुढील दीड वर्ष कर्जवसुली पूर्णपणे थांबवावी,” अशी मागणी रोहित पवार यांनी केली. ———————————————————— हेही वाचा… ब्रीच कँडीतील ‘ती’ 1 तास चर्चा:मोदींच्या फोनपाठोपाठ पटेल-सुनेत्रा पवारांकडून भेटीगाठी; विलीनीकरणाच्या चर्चांना का आले पुन्हा उधाण? इनसाइड स्टोरी ज्येष्ठ नेते शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्यांसाठी दाखल असतानाच, रुग्णालयाच्या दालनातून सुरू झालेल्या राजकीय हालचालींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाचे संकेत मिळत आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्यापाठोपाठ आता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान शरद पवारांनी पटेल यांना ’11 तारखेनंतर भेटू’ असा दिलेला निरोप आणि दुसरीकडे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, प्रियांका गांधी व उद्धव ठाकरे यांच्याकडून आलेले फोन, यामुळे या आजारपणाच्या सदिच्छा भेटींमागे ‘दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची’ किंवा नव्या राजकीय समीकरणांची स्क्रिप्ट शिजत आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सविस्तर वाचा
Source link
हॉस्पिटलमधील फोटोंचा पक्षांतर्गत राजकारणासाठी वापर करू नका!:पटेलांच्या भेटीवरून रोहित पवारांचा टोला; मुश्रीफांच्या ED क्लोजर रिपोर्टवरही प्रश्न